अधिवेशनात विरोधक होणार आक्रमक : म्हादईचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज सोमवार 16 जानेवारीपासून सुरू होत असून त्यात म्हादईचा विषय गाजणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. विरोधकांनी याच विषयावर रान उठवण्याचे निश्चित केले असून त्याला तोंड देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्य सरकारची खरी कसोटी लागणार आहे. नवीन वर्ष 2023 मधील पहिले अधिवेशन असल्याने त्याची सुरूवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांच्या अभिभाषणाने होणार आहे. 16 ते 19 जानेवारी असे चार दिवसच अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनासाठी 134 तारांकित तर 475 अतारांकित प्रश्न असून त्याशिवाय लक्षवेधी सूचना, सरकारी विधेयके, दुरूस्ती विधेयके, प्रश्नोत्तर तास शून्य तास व इतर कामकाजाचा समावेश करण्यात आला आहे. सध्या म्हादईचा विषय गोव्यात सर्वत्र खदखदत असून त्याचे पडसाद अधिवेशनात उमटणार असल्याचे दिसून येत आहे.
अधिवेशनात विरोधक होणार आक्रमक
सर्व विरोधी पक्ष आणि त्यांचे आमदार म्हादई प्रश्नावर एकत्र आले असून त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि त्यांच्या सरकारला आक्रमक होऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनात प्रश्नोत्तराऐवजी गदारोळ होणार असल्याची लक्षणे दिसत आहेत. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, म्हादईसाठी स्वतंत्र एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे अशा मागण्या विरोधी पक्षांनी केल्या होत्या, परंतु त्या सर्व फेटाळून लावण्यात आल्याने त्याचेही पडसाद अधिवेशनात दिसतील.
राज्यापालांच्या अभिभाषणावर चर्चा
अनेकांचे अभिनंदन आणि श्रद्धांजलीचे ठराव अधिवेशनात मांडण्यात येणार असून सरकारतर्फे एकूण 13 विधेयके, दुरूस्ती विधेयके सादर केली जाणार आहेत. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाल्यावर 17 व 18 जानेवारी असे दोन दिवस त्यावर चर्चा होणार आहे तर 19 जानेवारी या शेवटच्या दिवशी म्हादईवर चर्चा करण्याचे ठरवण्यात आले आहे. विरोधी आमदार त्यास कितपत प्रतिसाद देतात ते दिसणार असून 20 जानेवारीला विधिमंडळ मंचातर्फे म्हादईवर चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
म्हादईचा विषय केंद्रबिंदु ठरणार
म्हादईच्या पेटलेल्या ज्वलंत विषयाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन सुरू होत असून ते राज्यपालांच्या अभिभाषणाने चालू होणार आहे आणि म्हादईवरील चर्चेने संपुष्टात येणार आहे. काल रविवारी आरजी पक्षाची सभा झाली तर आज सोमवारी विर्डी येथे म्हादईवर जंगी सर्वविरोधी पक्षीय सभा आखण्यात आली आहे. त्याचा विषय एकच म्हणजे म्हादईच असून त्या सभांचे पडसाद अधिवेशनातही उमटतील असा अंदाज आहे.
अधिवेशनात विविध विषयांवर विविध प्रश्न विचारण्यात आले असले तरी सर्व विरोधक म्हादईच्या विषयाला महत्त्व देवून आवाज उठवतील असा अंदाज आहे.









