विश्वास प्रस्ताव आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार
चंदीगड / वृत्तसंस्था
पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी विश्वास प्रस्ताव आणण्यासाठी राज्य विधानसभेचे 22 सप्टेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपने चालवल्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विशेष अधिवेशन आमंत्रित करण्याचा पवित्रा घेतला आहे. 22 सप्टेंबर रोजी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल आणि विश्वासदर्शक ठराव आणला जाईल, असे सोमवारी त्यांनी स्पष्ट केले. भाजपने आम आदमी पक्षाच्या किमान 10 आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपये देऊन ‘ऑफर’ दिल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला होता.
117 सदस्यांच्या पंजाब विधानसभेत ‘आप’कडे सर्वाधिक 92 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 18, ‘एसएडी’कडे तीन, भाजप दोन आणि बसपा एक असे पक्षनिहाय बलाबल आहे. विधानसभेत एक अपक्ष सदस्यही आहे. आम आदमी पक्षाच्या हाती असलेली सत्ता हिसकावण्यासाठी इतर पक्षांकडून वेगवेगळय़ा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. “मोठय़ा जनादेशाने निवडून आलेले राज्य सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजपने आमच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा कसा प्रयत्न केला आणि पैसे आणि इतर आमिषे देण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही ऐकलेच असेल, असे मुख्यमंत्री मान यांनी सोमवारी पंजाबी भाषेतील व्हिडीओ संदेशात सांगितले. काही दिवसांपूर्वी पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत राज्यातील काही ‘आप’च्या आमदारांशी भाजपच्या लोकांनी संपर्क साधल्याचा आरोप केला होता. आता कायदेशीर पद्धतीने हा विश्वास दाखवण्यासाठी आम्ही 22 सप्टेंबरला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवत आहोत. या अधिवेशनादरम्यान, पंजाबला दोलायमान राज्य बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी निवडून आलेले आमदार किती कटिबद्ध आहेत हे आम्ही दाखवून देऊ, असे मान म्हणाले.









