ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय शेअर बाजाराचे ‘किंग’ (Share Market King) म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. मात्र पुन्हा आज सकाळी ६ वाजता प्रकृती खालवल्याने ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राकेश झुनझुनवाला यांची शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ म्हणून ओळख होती. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावायेच आणि त्यामुळे कसा फायदा होते याचे भाकित ते करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा. त्यामुळे अनेकजण त्यांचा सल्ला घ्यायचे. मात्र आता त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे.
८० च्या दशकात भारतीय शेअर बाजारामध्ये त्यांनी केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी नुकतीच ‘अकासा’ ही एअरलाईन सुरू केली होती. ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.५ बिलियन डॉलर्स आहे. सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे स्वप्न भारतीय गुंतवणूकदारांना दाखवणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे झुनझुनवाला होते. शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं. यामुळेच मध्यमवर्गीयांचे राकेश झुनझुनवालांच्या टिप्पणीकडे, त्यांनी सुचवलेल्या शेअर्सकडे लक्ष असायचं.









