वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सत्तरच्या दशकात फुटबॉलमधील उत्कृष्ट ‘प्लेमेकर’ राहिलेल्या मोहम्मद हबीब यांचे मंगळवारी निधन झाले. मोहन बागानतर्फे महान पेलेंच्या न्यूयॉर्क कॉसमॉसविऊद्ध खेळताना त्यांनी गोल केला होता आणि पेलेंनीही त्यांच्या खेळाची दखल घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून ते स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन्स सिंड्रोमने त्रस्त होते. आपले जन्मस्थान असलेल्या हैदराबादमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. हबीब यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.
हैदराबादी सहकारी सय्यद नईमुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली बँकॉकमध्ये 1970 च्या आशियाई खेळांत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचे हबीब हे एक भाग राहिले होते. कोलकाता येथील मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहम्मेडन स्पोर्टिंग या तिन्ही मोठ्या संघांचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते. 1960 च्या उत्तरार्धापासून 70 च्या दशकापर्यंत प्रदीर्घ कालावधीत त्यांनी फुटबॉलच्या मैदानावर वर्चस्व गाजविले.
मैदानावरील पराक्रमामुळे आलेले अनेक नोकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आणि देशातील पहिले खरे व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून गणल्या जाणाऱ्या हबीब यांनी मैदानावरील यशस्वी कारकिर्दीनंतर ‘टाटा फुटबॉल अकादमी’मध्ये प्रशिक्षक बनणे पसंत केले. नंतर त्यांनी हल्दिया येथील भारतीय फुटबॉल संघटनेच्या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले.
हबीब यांच्या कारकिर्दीतील एक ठळक वैशिष्ट्या म्हणजे त्यांनी मोहन बागानतर्फे दौऱ्यावर आलेल्या कॉसमॉस क्लबविऊद्ध खेळताना केलेला खेळ. 1977 मध्ये पावसाने भिजलेल्या ईडन गार्डन्स मैदानात झालेल्या त्या मैत्रिपूर्ण सामन्यात दिग्गज पेले देखील उपस्थित होते. पेले, कार्लोस आल्बर्टो, जॉर्जियो चिनाग्लिया आणि इतर दिग्गज नावांचा समावेश असलेल्या पाहुण्या संघाविऊद्ध मोहन बागानने 2-2 अशी बरोबरी साधली होती आणि त्यात मध्यफळीचा मुख्य आधार राहिलेल्या हबीब यांनीही एक गोल केला होता. खुद्द पेलेंनी सामन्यानंतर त्यांच्या खेळाची प्रशंसा केली होती.









