वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांनी मंगळवारी येथे फिफा-एआयएफएफ अकादमीचे उद्घाटन करताना भारतातील प्रतिभा शोधून काढण्याचे आणि देशाला जागतिक फुटबॉल नकाशावर आणण्याचे वचन दिले आहे. माजी आर्सेनल प्रशिक्षक वेंगर हे सध्या ‘फिफा’चे जागतिक फुटबॉल विकासाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी भारत महान खेळाडू कधी तयार करू शकेल याची कोणतीही कालमर्यादा सांगितली नाही, परंतु तळागाळात योग्य विकास झाला नाही, तर देश फुटबॉलमध्ये आता जसा आहे तसाच राहील, असे त्यांनी सांगितले.
आमचा प्रकल्प भारतातील प्रतिभा ओळखणे, सर्वोत्कृष्ट प्रतिभा एकत्रित करणे, त्यांना एक चांगला प्रशिक्षण कार्यक्रम देणे, त्यांना चांगले शिक्षण आणि चांगला स्पर्धांचा अनुभव देणे आणि त्यांना उत्तम खेळाडू बनवणे हा आहे, असे वेंगर यांनी सांगितले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि ओडिशा सरकार यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ते म्हणाले की, प्रतिभा शोधून काढून त्यांना शक्य तितके चांगले खेळाडू बनविण्याच्या दृष्टीने हा आमचा मोठा प्रयत्न आहे.
पहिल्या तुकडीमध्ये फिफा प्रशिक्षकांकडून 14 वर्षांखालील 50 खेळाडू निवडले जातील. यामध्ये 15 ओडिशातील असतील. या सर्वांना दोन वर्षांसाठी अकादमीमध्ये प्रशिक्षण मिळेल. ओडिशा सरकार खेळाडूंचा निवास आणि शिक्षणाची काळजी घेईल, तर फिफा तांत्रिक माहिती आणि प्रशिक्षक पुरवेल. दोन वर्षांसाठी अकादमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पेलण्यासाठी ‘फिफा’ने यापूर्वीच स्पेनच्या सर्जी अमेझकुवा फॉन्ट्रोडोना यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांचे यापूर्वी प्रकल्प संचालक म्हणून चीनमधील फुटबॉलच्या विकासात योगदान राहिलेले आहे. त्यांना एक भारतीय काही महिने मदत करेल, तर चार-पाच महिन्यांत परदेशी साहाय्यक प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येसह भारतामध्ये जगाच्या शीर्षस्थानी जाण्याची क्षमता खूप मोठी आहे. तेच आम्हा सर्वांना मिळून साध्य करायचे आहे. त्यासाठी किती वेळ लागेल मला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे. जर आपण प्रशिक्षण दिले नाही, तर सध्या जिथे आहोत तिथेच राहू. प्रशिक्षणाच्या दर्जामुळे तुम्हाला उत्तम खेळाडू मिळतात. आमचे उद्दिष्ट येथे अव्वल दर्जाचे खेळाडू विकसित करणे आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट देशांच्या नकाशावर आणणे हे आहे, असे वेंगर यांनी सांगितले. देशाला अव्वल स्तरावर पोहोचवायचे असेल, तर तऊण खेळाडूंना हेरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.









