सभापती रमेश तवडकर यांची माहिती
प्रतिनिधी/ मडगाव
काणकोणात तालुक्यात ज्यांना घरे नाहीत अशा लोकांसाठी स्थानिक लोकांनी श्रमदानाने घरे बांधली आहेत. त्यासाठी वापरण्यात येणारे लाकूड देखील कायदेशीरच असेल, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आपल्यावर खोतीगाव अभयारण्यातील लाकूड बेकायदेशीर तोडल्याचा आरोप जनार्दन भंडारी व विकास भगत यांनी केला आहे. या आरोपात काहीच तथ्य नाही. वादळी वारा आणि पावसाच्या माऱ्याने कोसळलेल्या लाकडांचा वर्षातून लिलाव केला जातो. हीच झाडे आपले समर्थक अशोक वेळीप, गावडोंगरी-काणकोण यांनी लिलावाद्वारे खरेदी केलेली आहे. त्यात जांबो, नाणो, निलगिरी, किंदळ या लाकडाचा समावेश असल्याची माहिती सभापती तवडकर यांनी दिली.
जर आपण झाडे तोडली असतील तर तसे पुरावे जनार्दन भंडारी व विकास भगत यांनी द्यावेत, असे आव्हान सभापती तवडकर यांनी दिले आहे. उगाच लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. दोन दिवसांपूर्वी जनार्दन भंडारी व विकास भगत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याला कुलूप लावून बंदिस्त केले होते. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी पोलीस तक्रार नोंद झालेली आहे. हे प्रकरण शेकण्याची शक्यता असल्याने त्यातून बचाव करण्यासाठीच जनार्दन भंडारी व विकास भगत यांनी लाकडाचे प्रकरण पुढे केल्याचे श्री. तवडकर म्हणाले.
लाकूड केवळ तीन घरांना पुरणार पाच ट्रक लाकूड आपण तोडल्याचा आरोप केला जात आहे. पण, प्रत्यक्षात लिलावातून खरेदी केलेले लाकूड केवळ तीन घरांसाठी वापरता येईल.









