म्हापसा पालिका बैठकीत ठराव मंजूर
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा येथील पालिका कर्मचाऱयांच्या मागणीपत्र (चार्टर ऑफ डिमांड ) विषयी कायदेतज्ञांचा सल्ला घेण्याचा ठराव पालिका मंडळाच्या बैठकीत सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. तसेच पालिकेच्या मालकीच्या जागेत असलेल्या दोन पेट्रोल पंप मालकांसोबतचा गेली सहा वर्षे नूतनीकरणाअभावी पडून असलेल्या भाडेपट्टी कराराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. पाच टक्के वाढीव रक्कमेने हा करार करण्याचा ठरावही घेण्यात आला.
नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी पालिका मंडळाची सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, अभियंता प्रदीप नार्वेकर, हळदोणाचे आमदार ऍड. कार्लुस फरेरा व सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
बैठकीत म्हापसा पालिका कर्मचाऱयांचा चार्टर ऑफ डिमांड विषय नगराध्यक्षांनी चर्चेस ठेवला. पालिकेच्या स्थायी समितीने या मागणीपत्रावर काढलेला निष्कर्ष नगरसेवक ऍड. आरोलकर यांनी पालिका मंडळासमोर सादर केला. 2016 मध्ये पालिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. तरीही मागण्यांची सनद वेळोवेळी वाढत आहे. या मागणीमुळे पालिकेवर मोठा आर्थिक भारच पडणार
नाही तर अशा भत्त्यात वाढीबाबत कोणतेही पालिकेकडे मापदंड नाही. शिवाय सर्व कर्मचारी हे सातव्या वेतन आयोगात समाविष्ट आहे का आणि ते अशा भत्यासाठी पात्र आहेत का? हे आधी तपसावे लागेल. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी कायदेतज्ञांचा सल्ला घेण्यात यावा अशी शिफारस स्थायी समितीने केली आहे असे आरोलकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार पालिका मंडळा यावर कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेत सर्वानुमते ठराव मंजूर केला.
शहरातील बुर्वे पेट्रोल पंपाच्या भाडेपट्टी कराराचे नूतनीकरण करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या पेट्रोल पंप चालकासोबतचा करार 2017 मध्ये संपुष्टात आला होता, मात्र तांत्रिक व इतर कारणास्तव या कराराचे नूतनीकरण करण्याचे राहून गेल होते. पूर्वी 73.21 रुपये दराने हा करार केला होता. आता सरकारचा 125 रुपये दर आहे, पण 2023 पर्यंत करार नूतनीकरण 5 टक्के वाढीव प्रमाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालिकेला 42 लाख रुपये महसूल मिळणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
दरम्यान म्हापसा पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांतील रस्ते हे अंदाजित 3 कोटी रुपये खर्च करून हॉटमिक्स करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. यातील 1 कोटी रुपये पालिका निधीतून खर्च करण्याचे चर्चेअंती ठरले. 21 ऑक्टोबर 2022 रोजी म्हापसा पालिका मंडळाची विशेष बैठक झाली होती. मात्र या बैठकीच्या इतिवृत्तांत आपल्याला गैरहजर दाखविल्याने नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले. तुम्ही ही चूक मुद्दामहून करत आहात असा आरोप त्यांनी केला. हे चुकून घडले असून यात दुरुस्ती केली जाईल अशी ग्वाही नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी भिवशेट यांना दिली.
पालिका कर्मचाऱयांच्या चार्टर ऑफ डिमांडच्या चर्चेवेळी नगरसेवक प्रकाश भिवशेट व नगरसेवक ऍड. शंशाक नार्वेकर यांनी नगराध्यक्षांना लक्ष्य बनविले. यावेळी बैठक वादळी ठरली. इतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. हा विषय मागील कित्येक महिन्यांपासून रेंगाळत आहे. अगोदर चार्टर ऑफ डिमांड विषयी कायदेशीर सल्ला घेतला असता तर संप झालाच नसता. तुमच्या चुकीमुळे पालिकेने संप ओढवून घेतला, असा आरोप नगरसेवक भिवशेट यांनी नगराध्यक्षांवर केला. नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांकडे नगराध्यक्षा या दुर्लक्ष करीत कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप ऍड. नार्वेकर यांनी केला.
पालिकेच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेचे नूतनीकरण करण्याचा अधिकार पालिका मंडळाला आहे. पण भाडे रक्कम व भाडेपट्टीचा कालावधी सरकार निश्चित करेल. अशा नियम व अटी नगरपालिका कायदा कलम 88 (2) व उपकलम 3 नुसार राज्य सरकारने सुधारित कायदा मंजूर केला आहे. या कायद्याला गेल्या विधानसभेत 21 जुलै 2022 रोजी मान्यता देऊन 15 सप्टेंबर 2022 रोजी हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झालेला आहे. या कायद्याबद्दल पालिका मंडळ अनभिज्ञ होते. पालिका मंडळाच्या बैठकीत नगरसेवक प्रकाश भिवशेट यांच्याकडून फाईल घेत नगराध्यक्षांच्या परवानगीने या कायद्याचे वाचन आमदार ऍड. कार्लुस फेरेरा यांनी केले. तरीही पालिका मंडळाने 5 टक्के वाढीव रकमेवर पेट्रोल पंप चालकासोबत मालमत्तेचे नूतनीकरण करण्याचा ठराव मंजूर केला.









