मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा : हुतात्मा स्मृती भवनासाठी विभागवार समिती, डिसेंबर 2026 पूर्वी भवन पूर्णत्वास नेण्याचा संकल्प
बेळगाव : मराठी भाषिकांना गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू असतो. काही युवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठी अस्मिता जपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मध्यवर्ती म. ए. समिती ठामपणे कार्यरत राहील. त्यांच्यासाठी कायदेशीर लढा दिला जाईल. परंतु कार्यकर्त्यांनीही सहनशीलता राखणे गरजेचे आहे, अशी चर्चा मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आली.
बुधवारी मराठा मंदिरच्या सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी एखादे आंदोलन अथवा कार्यक्रम ठरविताना त्याची थोडीशी जाणीव वरिष्ठ लोकांना दिली तर संभाव्य धोके टाळता येणार आहेत. युवा कार्यकर्ते शुभम शेळके यांच्यावर तडीपारीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी वकिलांचा सल्ला घेण्यात आला असून तशा पद्धतीने कार्यवाही केली जात आहे.
हिंडलगा येथे हुतात्मा स्मृतीभवन उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. देणगीचा ओघही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या नियोजनासाठी विविध कमिट्या स्थापन करण्यात येणार आहेत. काम गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. डिसेंबर 2026 पूर्वी हे भवन पूर्णत्वास नेण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर 1 मे रोजी आंदोलन करावे का? यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली.
स्मृतीभवनासाठी मराठा मंदिरने पुढाकार घ्यावा
हिंडलगा येथे हुतात्मा स्मृतीभवन बांधण्यात येणार आहे. बेळगावमधील मराठा मंदिरला जागा उपलब्ध करून देण्यापासून त्यांचा कर माफ करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका वेळोवेळी म. ए. समितीने बजावली आहे. स्मृतीभवनासाठी मोठा खर्च येणार असून मराठा मंदिरने एक मजला बांधून द्यावा, असा ठराव मध्यवर्तीच्या बैठकीत सर्वानुमते मांडण्यात आला. याचबरोबर प्रत्येक घटक समित्यांची स्मारकासाठी स्वतंत्र कमिटी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. यावेळी मनोहर किणेकर, गोपाळ देसाई, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, बाबुराव पाटील, रामचंद्र मोदगेकर, मल्लाप्पा गुरव, निरंजन सरदेसाई, अनिल पाटील, बाळासाहेब फगरे, विजय पाटील, आर. के. पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.









