अधिकाऱ्यांनी धाड टाकून जादा दुध घेताना रंगेहात पकडले, शिरोळ तालुक्यात खळबळ
शिरोळ/प्रतिनिधी
शिरूर तालुक्यात विविध सहकारी संस्थेच्या व खाजगी व्यक्ती दूध खरेदी विक्री करतात. या दुधामध्ये मापात पाप करत असल्याची तक्रार आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेचे धनाजी चोरगे व अन्य कार्यकर्त्यांनी केली होती या आधारे आज त्या काट्याची अचानक धाड टाकून अचूकता तपासली असता हेरवाड व टाकवडे या दोन गावातील डेअरीत उत्पादकाकडून जादा दुध घेतले जात असल्याचे तालुका वजन मापे अधिकारी म.आ. मोदी यांना आढळून आल्याने त्यांच्यावर वैध मापन शास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिरोळ तालुका खळबळ माजली आहे.
याबाबतची माहिती अशी की, हेरवाड येथील शेतकरी सहकारी दुध येथे 4 लिटर मध्ये 100 मिली दुध जादा घेतल्याचे धाडीत सापडले. तर टाकवडे येथे खाजगी दुध संकलन केंद्रात मापात पाप करीत असल्याचे आढळून आले आहे.
आंदोलन अंकुश ने दुध डेअरीकडून दुध उत्पादकांची लूट करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व दुध डेअरींवर धाडी टाकून वजन काट्यांची तपासणी करण्याची मागणी उप नियंत्रक रा.ना. गायकवाड वैध मापन शास्त्र, कोल्हापूर यांच्याकडे केली होती. त्यावर त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार शिरोळ तालुक्यात दुध डेअरी वर धाडी टाकल्या गेल्या व त्यामध्ये शेतकरी सहकारी दुध संस्था हेरवाड व टाकवडे येथील एक संकलन केंद्र अशा दोन डेअरींकडून उत्पादकांचे जादा दुध घेतले जात असल्याचे पडताळणीत आढळून आले.
या दोन संस्थांवर वैध मापन शास्त्र (अ ) मधील 30 ( c ) नुसार कारवाई झाली व हेरवाड येथील काटा सील केला आहे. तालुक्यातील सर्व दुध डेअरीची तपासणी करणार असल्याचे समजते आहे