सांगली/शिवराज काटकर
भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष. शिस्तबद्ध आणि वरून आलेला आदेश ऐकणाऱ्यांचा पक्ष हीच त्यांची प्रदीर्घकाळ ओळख होती. मात्र आता त्या जुन्या कार्यकर्त्यांचे दिवस गेले. आता पक्षाचे “वॉरियर्स” आले आहेत. ते पक्षाची सत्ता आणण्यासाठी नंतर, आधी स्वतःची सत्ता अबाधित राखण्यासाठी परस्परांशी “वाॅर” करायला आसुसले आहेत. कोणी कोणाच्या विरोधात आघाडी उघडतो, कोणी स्वतःच दुसऱ्याची उमेदवारी जाहीर करतो, कोणी विरोधकांच्या व्यासपीठावर जाऊन आंदोलनाला पाठिंबा देतो तर कोणी मंत्र्याविरोधात मोहीम उघडतो! दुष्काळी फोरमसह विविध पक्षातून आलेल्या नेत्यांच्या तावडीत भाजप असा सापडला आहे. तक्रार करायची तर कोण आणि कुणा विरोधात? हा प्रत्येकापुढे प्रश्न आहे…. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्षाच्या वॉरियर्स कार्यकर्त्यांना तयार करायला आले खरे. पण, त्यांना पक्षाचे नेतेच खरे खुरे वॉरियर्स बनून एकमेकांना खेचत आहेत हे पाहून परतावे लागत आहे…! गटबाजी म्हणजे पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण असे पूर्वी काँग्रेसचे नेते हसत हसत सांगायचे… आता “वॉरियर्स” ज्यांच्या विरोधात कारवाया करतात त्यांच्याच खांद्यावर हात ठेऊन तेच सांगू लागले नाहीत म्हणजे मिळवले.
पक्ष आपल्या मूळच्या शिस्तीला विसरू लागला आहे. त्याचे गल्लीपासून मंत्रालयापर्यंतचे अनेक किस्से जिल्ह्यात चर्चिले जात आहेतच. खुद्द पालकमंत्र्यांविरोधात त्यांच्या गावात त्यांच्याच व्यक्तीने खुले आव्हान दिले तरी पक्षात खपून गेले आहे. त्यामुळे आता राज्यस्तरावरील नेते मंडळींनाही या वादात सामील करून घेतले जात की काय? अशी शंका यावी इतके टोकाचे मतभेद दिसून येत आहेत. पूर्वी या पक्षात बाहेरून जर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता आला तर त्याला सामावून घेण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांची बोळवण केली जायची. पक्षाच्या वाढीसाठी नवीन लोक येणे गरजेचे आहे आणि त्यांच्यासाठी आपण थोडी जागा करून दिली पाहिजे, असे ते सांगायचे आणि कार्यकर्ते ऐकायचे. त्यांना निष्ठावंत भाजप वंचित आघाडी स्थापन करावी लागली आहे. ते तर बेदखल आहेतच पण आता, गाव तितके गट आणि त्यांचे वादच समोर येत आहेत.
ताजे ताजे वादाचे कारण आहे ते, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख हे टेंभूच्या विस्तारित योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुमनताईं पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या व्यासपीठावर गेले आणि त्यांनी सुमन ताईंना पाठिंबा दर्शवला. दोनच दिवसांपूर्वी संजय काकांनी पाटील मायलेकाच्या आंदोलनाला नौटंकी म्हटले होते. हे होण्यापूर्वी पृथ्वीराज बाबांच्या विरोधातील एक पत्र विविध शासकीय कार्यालये आणि वृत्तपत्रातूनही फिरत होतै. ज्यामध्ये केवळ आरोपच होते! अर्थात ते कोण पसरवले ते नाव पुढे आलेले नाही. पण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे वाद सुरू झाले आहेत. बाबांना मानणारे कार्यकर्ते यंदाच्या लोकसभेला बाबांना तिकीट मिळणार असे सांगत फिरत आहेत तर बाबा स्वतःची फिल्डिंग लावत आहेत. काकांनीही जिल्ह्यात एकट्याने दौरा सुरू केला आहे. रोज काही गावे पिंजून काढायचा सपाटा त्यांनी लावला आहे.
जिल्ह्यातील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या सुप्त संघर्षात एक स्फोट माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनीही केला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार समारंभात त्यांनी पडळकरना खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे तिकीटच जाहीर करून टाकले! हा हक्क पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला असतो. पण, यापुढे विधानसभेला एकच छंद… अशी अण्णांनी घोषणा केली आणि मागे गोपीचंद… असा प्रतिसाद आला! तसा हा मतदारसंघ मित्र पक्षाच्या वाट्याचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार अनिल बाबर इथून निवडून आले आहेत आणि त्यांचा दावाही आहे. ज्या पक्षाचा जिथून आमदार आहे तिथली जागा त्या पक्षाला मिळते या न्यायाने बाबर विधानसभेला आपली उमेदवारी निश्चित मानून चालले आहेत. पण, इथे तर उमेदवाराची घोषणाही झाली.
बाबर या पक्षात नसले तरीही त्यांचा तिथे शब्द चालतोच. सुमनताई आणि रोहित पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि फडणवीस यांचा संदेश घेऊन आंदोलन स्थळी पोहोचले ते आमदार अनिल बाबर! त्यांच्याच फोनवर देवेंद्र फडणवीस बोलले आणि त्यांचे म्हणणे बाबर यांच्या फोनवरूनच स्पीकरद्वारे सार्वत्रिक केले गेले! त्यापूर्वीच दोन रात्री आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टेंभूच्या विस्तारित प्रकल्पाला मान्यतेचे पत्र अत्यंत घाईने बाबर यांच्याच हाती सोपवले गेले होते. त्याचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून केले होते आणि त्याच पत्राचा एक भाग असलेल्या सातारा जिल्ह्यातील टेंभू योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच रात्री ट्विटर वरून केली होती! आता पक्ष शिस्तीचे होणार काय?
खा. संजय काका आणि आ. गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये विलासराव जगताप यांच्या विरोधात आघाडी उभी केली आहे. जगताप जत मधून स्वतः किंवा स्वतःच्या अनुयायाला लढवू इच्छितात. खानापूरची जागा सेनेला सोडली तर जत मधून आपल्याला विधानसभा लढायला मिळावी, धनगर समाजाच्या मतावर आपण इथून निवडून येऊ असे गोपीचंद पडळकर यांना वाटते. त्यामुळे त्यांनी काकांच्या जवळ असणाऱ्या मंडळींसोबतच पक्षातील इतर मंडळींनाही आपला स्थानिक विकास देऊन जतेत उद्घाटनांचा सपाटा चालवला. यामुळे अर्थातच जगताप पेटून उठले. त्यांनी उघडपणे टीका केलीच शिवाय पक्षाध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला! काही काळ हा वादही बराच गाजला.मात्र त्यावर तडजोड झाली नाही.
मिरज तालुक्यातील बेडग प्रकरणातून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात चक्रव्यूह रचले गेले. पक्षाची मंडळी यात सुद्धा होती आणि मित्र पक्षातील मंडळींनीही आपल्या विरोधात मोहीम उघडली होती असा ठाम दावा पालकमंत्री सुरेश खाडे करत आहेत. पण तक्रार कुणाची आणि कोणापुढे करायची असा त्यांच्या समोर प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच त्यांना मंत्रालयातील बैठकीतून बाहेर जावे लागले. एका मंत्र्यासाठी हे खूपच अपमानास्पद होते. पण यातून पक्षात खूप चर्चा झडू लागली. गेल्या काही दिवसात काही मंडळींनी जिल्ह्यातील पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या लोकांना भेटून भाजपमध्ये होत असलेला इतर पक्षातील हस्तक्षेप आणि त्याचा खाडेंसारख्या व्यक्तीलाही बसलेला फटका याची दखल गरजेची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वांनी एकत्र जाऊन तक्रार केली पाहिजे आणि पूर्वी प्रकाश शेंडगे यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जसे प्रस्थ माजले होते तसे आता आणखी कोणाचे माजू नये म्हणून पुढाकार घेण्यासाठी काही मंडळींच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र फडणवीस यांना सांगायचे कोण? की सगळ्यांनी मिळून चंद्रकांत दादांच्याकडे याची तक्रार करायची? यावर देखील बरीच खलबते झडत आहेत. त्यातच मिरजेत बावनकुळे यांचे स्वागत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाले! एकूणच पक्षाचे वॉरियर्स निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी परस्परांना भिडायला सज्ज झाले आहेत. प्रत्येक मतदारसंघात असा सुप्त संघर्ष आणि एकाला दुसरा पर्याय उभा राहत आहे. त्यामुळे शिस्तप्रिय पक्षात दुष्काळी फोरम आणि मित्र पक्षांच्या नेत्यांचे सुरू असलेले वाद पक्षाला डोकेदुखी ठरायचे चिन्ह आहे.








