एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला विचारले की तुझ्या घरापासून एका महाविद्यालयात सायकलवरून जायचे असल्यास कोणत्या मार्गाने जाणार? यावर तिने गुगल मॅपची मदत घेणार असल्याचे तत्परतेने सांगितले. अशी कोणतीही मदत न घेता मार्गक्रमण कसे करणार असा प्रश्न पुन्हा विचारल्यावर ती अचंबित झाली, स्तब्ध झाली. या प्रश्नावर अशी प्रतिक्रिया येण्याचे कारण तिच्या आई-वडिलांनी तिला पुण्यात राहूनही कुठेही एकटे पाठवले नाही. शिवाय घर ते शाळा हा प्रवास शाळेच्या बसमधून होत असल्यामुळे तिने आजतागायत शहर बघितलेलेच नाही. अशी अवस्था पुण्यासारख्या शहरातील ‘इंटरनॅशनल’ स्कूलमधील दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची असेल तर इतर शहरामध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पना केलेली बरी. छोट्या गावामध्ये त्यामानाने परिस्थिती उत्तम असते कारण अनेक मुला-मुलीना शाळेमध्ये जाण्यासाठी किमान दोन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. पालकांनी मुला-मुलींचे बोट सोडण्याबरोबर मुख्य मुद्दा झटपट दिशा ओळखून त्याप्रमाणे रस्ते निवडणे आणि त्यामध्येही जवळचा रस्ता शोधून त्यानुसार इच्छित स्थळ गाठणे हे कौशल्य उजव्या मेंदूशी संबंधित आहे.

कोणालाही पत्ता विचारावा. “या रस्त्याने सरळ गेल्यावर एका पानाच्या टपरीला उजवीकडे वळा, तिथून पुढे दोन चौक ओलांडल्यावर डावीकडील पाचवी बिल्डींग” इतका ठोस पत्ता सांगणारी व्यक्ती उजवा मेंदू तल्लख आहे, हे सांगू शकतो. परंतु सहसा पत्ता सांगताना अनेकजण त्यासाठी फार कष्ट न घेता “या रस्त्याने सरळ गेल्यावर एका पानाच्या टपरीजवळ कुणालाही विचारा” असा शॉर्टकट घेतात. त्यामुळे उजवा मेंदू वापरण्याची संधी हुकते. काही जण पत्ता सांगण्यापेक्षा तत्परतेने कागदावर नकाशा काढून देतात. असे नकाशे झटपट काढणे डाव्या मेंदूचे प्राबल्य असलेल्या व्यक्तीना कठीण जाते. दोन्ही हाताने लिहू शकणारे लोक मेंदूच्या दोनही भागांचा वापर करण्याची शक्यता अधिक असते. एखादे मूल उत्स्फूर्तपणे डाव्या हाताने लिहित असेल किंवा जेवणासारख्या काही कृती डाव्या हाताने करत असेल तर त्याला पालकांनी आडकाठी आणू नये. खरे तर लाईटचा स्विच ‘ऑन’ करणे, चहाचा कप उचलणे अशा कामासाठी साहजिकपणे सवयीने जो हात वापरला जातो तो न वापरता दुसरा हात वापरण्याच्या अनवट कृतीने उजवा मेंदू कार्यरत राहतो.
उजवा आणि डावा असे मानवी मेंदूचे दोन भाग असतात. शब्दांचा वापर करून विचार करणे, त्याचा क्रम लावणे, र्त्ग्ही tप्ग्हक्ग्हु म्हणजेच एकरेषीय विचार करणे, दिसणाऱ्या शब्द-वाक्य-पुस्तकांचे वाचन, वस्तुस्थिती बघून तर्कशास्त्रानुसार विचार करणे/ठोकताळे आडाखे बांधणे अशी कामे डावा मेंदू करतो. शालेय शिक्षणाचा बराचसा भाग डाव्या मेंदूशी निगडीत असतो. समोर दिसणाऱ्या चित्राचे वाचन करून त्यामधून अर्थ काढणे, सांकेतिक चिन्हांचा स्वत:च्या बुद्धीचा वापर करून अर्थ लावणे, कलेची जाण, लय-ताल याची समज, विविध वाद्यांमधील फरक संगीत ऐकून लीलया ओळखणे, कठीण प्रसंगी अंत:प्रेरणेने तत्पर निर्णय घेणे अशी अनेक कौशल्ये उजव्या मेंदूशी निगडीत असतात. एक प्रसिद्ध कोडे वाचनासाठी दिले जाते, ज्यामध्ये रंगांची नावे वेगळ्या रंगात लिहिलेली असतात. म्हणजे ‘लाल’ हा शब्द पिवळ्या रंगामध्ये लिहिलेला असतो तर ‘निळा’ हा शब्द पांढऱ्या रंगामध्ये लिहिलेला असतो. अशावेळी डावा मेंदू लिहिलेले अक्षर वाचायला लावतो तर उजवा मेंदू शब्दांचा रंग ओळखून तो शब्द उच्चारण्यास भाग पाडतो. त्यावेळी वाचणाऱ्या व्यक्तीचा गोंधळ होतो.
मेंदूच्या डाव्या भागाचा अधिक वापर करणारी मंडळी घड्याळाच्या काट्यावर काम करतात, आज करण्याच्या कामाची यादी तयार करणे याना विशेष आवडते. त्यांचे घड्याळाकडे नेहमी लक्ष असते. घड्याळ घरी विसरल्यास त्यांचा दिवस अस्वस्थतेमध्ये जातो. हे लोक नियमितपणे डायरी लिहितात, शिस्तबद्ध रीतीने काम करत असल्यामुळे कारणमीमांसा मुद्देसूदरीत्या करू शकतात, दिलेल्या सूत्रानुसार गणिते पटापट सोडवतात, त्यांचे स्पेलिंग लिहिण्याचे कौशल्य वादातीत असते, त्यांचे कपडे ठेवण्याचे कपाट/कप्पा फारच व्यवस्थित असतो. ‘अमुक एक मार्गच योग्य आहे’ असे यांचे ठाम मत असल्यामुळे ते दुसऱ्या पर्यायांचा विचार करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांचा साचेबद्ध विचार होत असतो. “Rद् ते traनत्त्” हे डाव्या मेंदूने विचार करणाऱ्या लोकांना पटत नाही. काही मुला-मुलींना शिस्त पाळणे बिलकुल आवडत नाही. अशा मुलांना सकाळी साडेसात ते साडेआठ वाचन करण्याच्या सूचना देऊ नयेत. दिवसभरात कोणत्याही एका तासात त्या मुला-मुलीने वाचन करण्याची मुभा दिल्यास अभ्यासाचे उद्दिष्ट गाठता येईल आणि उजवा मेंदूही कार्यरत राहण्यास मदत होईल. साचेबद्ध जगणे आणि शिस्त पाळणे या भिन्न बाबी आहेत. घड्याळाच्या काट्यावर काम करणे/अभ्यास करणे अनेकांना जमत नाही. त्यांनी नेमून दिलेल्या वेळेत काम/अभ्यास केला तरी चालू शकते. अशी मुले ‘लवकर निजे-लवकर उठे, तयाला ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे’ या कोष्टकात बसणारी नसतात. काही मुले पहाटे अभ्यास करतात तर काही विद्यार्थ्यांचे वाचन रात्रीच्या वेळी अधिक लक्ष देऊन होत असते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, विचार करण्याची पद्धत वेगळी असते, याचा विचार करण्याची गरज आहे.
उजवा मेंदू कलेच्या प्रांताशी जवळीक साधणारा आहे. त्यामुळे संगीताचे उपजत ज्ञान असणे, तालाला पक्का असणे, अंगामध्ये लय भिनलेली असणे, थोड्याफार ‘स्टेप्स’ शिकल्यावर तत्परतेने आत्मसात करून नृत्य करणे असे गुण आत्मसात करणारी माणसे ‘उजवी’ असतात. पण उजव्या मेंदूचा वापर अधिक करणारी माणसे काळ-काम-वेग याचे गणित उत्तम पद्धतीने करू शकत नाहीत. त्यामुळे ही माणसे दिलेल्या वेळा पाळू शकत नाहीत. वेळेचे भान हरपून एकच कृती तासनतास करत बसणे ही यांची खासियत असते. रोज अंघोळ करणे या मुलांना वेळ वाया घालवण्यासारखे वाटते. ही मुले गादीवर एक लाथ मारून ती उलगडून त्यावर झोपतात, सकाळी तशीच लाथ मारून गादीची गुंडाळी करण्याचा प्रयत्न करतात. ही मुले खाणा-खुणा उत्तमरीत्या ओळखू शकतात, नव्या पद्धतीने नवीन सांकेतिक भाषा वापरू शकतात. स्वतंत्रपणे विचार करणे ही यांची खासियत असल्यामुळे त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु/मार्गदर्शक असण्याची गरज भासत नाही. अशा मुलांना सतत सूचना देणारे पालक-शिक्षक आवडत नाहीत.
बऱ्याच व्यक्तींमध्ये उजव्या आणि डाव्या मेंदूने विचार करण्याची काही वैशिष्ट्यो दिसून येतात. त्यापैकी कोणत्या कौशल्याला पालकांनी खतपाणी घातले, परिस्थितीनुसार कोणत्या बाजूने विचार करण्यास चालना मिळाली, मिळालेल्या संधीचा वापर केला अशा अनेक बाबी अवलंबून आहेत. प्रत्येक व्यक्तीने मेंदूच्या दोन्ही बाजूची कौशल्ये शिकून घ्यावीत. मेंदू कार्यरत ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम करावा, आठ तासांची झोप घ्यावी, शब्दकोडी सोडवावीत, आहार संतुलित घ्यावा आणि त्यामध्ये एक नियमितपणा/वेळापत्रक असावे. अर्थात उजवा मेंदू कार्यरत ठेवण्याचे शिक्षण शाळेमध्ये मिळत नसते. त्यासाठी त्या व्यक्तीने आणि बालकांच्या पालकांनी जाणतेपणाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.
-सुहास किर्लोस्कर








