केएलई शताब्दी सभागृहात आयोजन : सचिव अॅड. एम. बी. जिरली यांची माहिती
बेळगाव : हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिर (अॅकॅडमी ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन सेंटर) तर्फे दि. 24 ते 26 एप्रिल दरम्यान मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष व गीता परिवाराचे संस्थापक गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरूनगर येथील केएलई शताब्दी सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती सचिव अॅड. एम. बी. जिरली यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गोविंददेव गिरीजी महाराज हे ‘श्रीकृष्ण नीती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अयोध्या येथील रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष म्हणून ते काम पाहात आहेत. देशातील एक प्रमुख आध्यात्मिक गुरु म्हणून ते सर्वत्र प्रवचन, व्याख्याने देत असतात. भगवद्गीतेचे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ ‘लर्न गीता’सारखा उपक्रम त्यांनी राबविला आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘देश का आधार, युवा संस्कार’ या विषयावर हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिर येथे कार्यक्रम होईल. व्याख्यानमालेचा समारोप शनिवार दि. 26 रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित राहणार आहेत. एसीपीआरची स्थापना 1924 मध्ये गुरुदेव डॉ. आर. डी. रानडे यांनी केली. सध्या या संस्थेचे शताब्दी वर्ष सुरू असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून गोविंददेव गिरीजी महाराजांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित रहायचे आहे. त्यांनी हिंदवाडी येथील रानडे मंदिरातून प्रवेशिका घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेवेळी उपाध्यक्ष सुब्रमण्यम भट, जॉईंट सेक्रेटरी आर. जी. जकाती, स्वाती जोग यासह इतर उपस्थित होते.









