प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभागातर्फे ‘राष्ट्रवादाची संकल्पना ः सामूहिक कार्य व सकारात्मक विचारांची शक्ती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बेळगाव येथील सीआरपीएफच्या कोब्रा स्कूल जंगल वॉरफेअर टॅक्टिसचे डीआयजी एम. एल. रविंद्र यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवाद ही एक विचारसरणी असून, आधुनिक समाजाचा व सामाजिक एकतेचा पाया आहे. संघकार्य, राष्ट्रवाद, देशभक्त व मातृभूमीवर प्रेम या मूलभूत गोष्टी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये रुजल्या पाहिजेत, असे एम. एल. रविंद्र यांनी सांगितले.
प्राचार्य जयंत कित्तूर यांनी राष्ट्रवाद व देशभक्ती याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एमबीए विभागप्रमुख डॉ. कृष्णा शेखर यांनी एम. एल. रविंद्र यांचे आभार मानले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.









