बेंगळूर
येथील कंठीरेवा स्टेडियमवर सुरु असलेल्या सॅफ चॅम्पियनशिप 2023 च्या फुटबॉल स्पर्धेत ब गटातील झालेल्या सलामीच्या सामन्यात लेबेनॉनने माजी विजेत्या बांगलादेशचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
या सामन्यात लेबेनॉनतर्फे हसन मेटॉक आणि खलिल बादेर यांनी सामन्याच्या उत्तरार्धात प्रत्येकी 1 गोल केला. फिफाच्या मानांकनात 99 स्थानावर असलेल्या लेबेनॉनचा संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविला होता. सामन्याच्या पूर्वार्धात लेबेनॉनने आक्रमक खेळ करत बांगलादेशवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला पण बांगलादेशने लेबेनॉनला आपल्या भक्कम बचावात्मक खेळीने चोख प्रत्युत्तर दिले. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. 59 व्या मिनिटाला बांगलादेशला खाते उघडण्याची चांगली संधी मिळाली होती. पण त्यांना आपले खाते उघडता आले नाही. 69 व्या मिनिटाला लेबेनॉनचा पहिला गोल नोंदविला गेला. हसन मेटॉकने बांगलादेशच्या बचाव फळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षक अनिसूर रेहमानला हुलकावणी देत चेंडू अचूकपणे गोलपोस्टमध्ये धाडला. या सामन्यात निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या ज्यादा कालावधीमध्ये लेबेनॉनच्या खलील बादेरने रिकाम्या असलेल्या गोलपोस्टमध्ये आपल्या संघाचा दुसरा गोल नोंदविला. आता या स्पर्धेत लेबेनॉनचा पुढील सामना भुतानशी तर बांगलादेशचा पुढील सामना मालदीव बरोबर 25 जूनला खेळविला जाणार आहे.









