वृत्तसंस्था/ चियाँग मेई (थायलंड)
येथे सुरू असलेल्या 49 व्या किंग्ज चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी तिसऱ्या स्थानासाठी भारत आणि लेबेनॉन यांच्यात फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाला उपांत्यफेरीच्या सामन्यात इराककडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
भारत आणि लेबेनॉन यांच्यात यापूर्वी तीन वेळेला सामने झाले असून त्यापैकी एकाही सामन्यात भारतीय संघाने लेबेनॉनकडून गोल करवून घेतलेला नाही. आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भारताने लेबेनॉनला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यानंतरच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने लेबेनॉनचा 2-0 असा पराभव करून जेतेपद मिळविले होते. सॅफ चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने लेबेनॉनचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव केला होता.









