वृत्तसंस्था/ चियांग माई, थायलंड
थायलंडच्या चियांग माई येथील ‘सेव्हन हंड्रेथ अॅनिव्हर्सरी स्टेडियम’वर झालेल्या किंग्स कपमधील तिसऱ्या स्थानासाठीच्या ‘प्लेऑफ’ लढतीत भारतीय फुटबॉल संघाला लेबनॉनविऊद्ध 0-1 असा पराभव पत्करावा लागला. हल्लीच्या काळात झालेल्या लेबनॉनविऊद्धच्या सामन्यांत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे. परंतु दुसऱ्या सत्रातील कासिम एल. झेनच्या जबरदस्त फटक्याने सारा फरक घडवून आणला आणि भारतीय संघ त्या कामगिरीची पुनरावृत्ती घडविण्यात अपयशी ठरला.
भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी या सामन्यासाठी संघात काही बदल केले होते. विंगर लाल्लियानझुआला छांगटे आजारपणातून ठीक झाल्याने संघात परतला, तर आशिष रायने निखील पुजारीच्या जागी उजव्या बाजूचे स्थान घेतले. स्टिमॅच यांच्या खेळाडूंनी इराकविऊद्धच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही खेळाला चांगल्या पद्धतीने सुऊवात केली. भारताला मिळालेल्या पहिल्या खऱ्या संधीत नौरेम महेश सिंगने मनवीर सिंगला चांगल्या प्रकारे क्रॉस पुरविला होता. परंतु मनवीरचा हेडर गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला.
भारताने त्यानंतर आणखी दोन संधी निर्माण केल्या, परंतु लेबनॉनचा बचाव भक्कम राहिला. मात्र लेबनॉनच्या आक्रमणात दर्जा दिसला नाही आणि पहिले सत्र गोलरहित स्वरुपात संपुष्टात आले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अधिक आक्रमक खेळ करण्यासाठी स्टिमॅच यांनी पुजारी आणि ब्रँडन फर्नांडिस यांना आशिष राय आणि अनिऊद्ध थापा यांच्या जागी आणले. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला लेबनॉनला पहिली खरी संधी मिळाली. यावेळी त्यांनी वेगवान प्रतिआक्रमण करून नादेर माटरने गोलच्या दिशेने फटकाही हाणला होता. परंतु गोलरक्षक संधूला तो चकवू शकला नाही.
लेबनॉनने हळूहळू खेळावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर भारताला पहिल्या सत्रातील कामगिरीचा फायदा उठवता आला नाही. भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी आणखी काही आक्रमक बदल केले असले, तरी दुसऱ्या सत्रात लेबनॉनने जास्त संधी निर्माण केल्या. 69 व्या मिनिटाला फर्नांडिसने राहुल के. पी. ला परिपूर्ण पास दिला, पण राहुलचा प्रयत्न लेबनॉनच्या गोलरक्षकाने रोखला.
काही क्षणांनंतर लेबनॉनने कॉर्नर किकवर कोंडी फोडली. यावेळी करीम डार्विचने हाणलेली आणि आंत वळणारी कॉर्नर कीक गुरप्रीतने उत्कृष्टरीत्या बचाव करताना निष्फळ ठरविली होती. परंतु परतलेल्या चेंडूवर कासिम अल झेनने बॅक व्हॉली हाणून गोल केला. भारतीय संघाने त्यानंतर घाईघाईने बरोबरी साधण्याकरिता प्रयत्न केले, पण शेवटच्या मिनिटांत लेबनॉनने खंबीरपणे बचाव केला.









