अनुसूचित’चे 13 प्रभागाचे पूर्वीचे आरक्षण कायम
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी शुक्रवारी (29) आरक्षण सोडत निघणार आहे. पूर्वी काढण्यात आलेल्या 13 प्रभागातील ‘अनुसूचित’च्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. 79 प्रभागातून ओबीसी, ओबीसी महिला, ओपन महिला प्रवर्गासाठी चिठ्ठीने आरक्षण काढले जाणार आहे. यामध्ये 22 जागा ओबीसीसाठी (इतर मागास प्रवर्ग) असणार आहेत. आरक्षण सोडतीनंतर निवडणूकीची पुढील प्रक्रिया राबवली जाणार असून सप्टेंबरच्या अखेरीस अथवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महापालिकेची 31 प्रभाग आणि 92 सदस्य अशी प्रभाग रचना करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागला होता. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 13 याचिका दाखल झाल्या. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी शिवाय निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. यानंतर महापालिकेनेही आयोगाच्या आदेशानुसार ओबीसीशिवाय 31 प्रभागातील आरक्षण सोडत काढली होती. याच दरम्यान, राज्यशासनाने ओबीसींना पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळण्यासाठी धडपड सुरू केली. यासाठी बांठिया आयोग नेमून राज्यातील ओबीसींचा सर्व्हेक्षण करण्यात आले. बांठिया आयोगाने ओबीसीना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारा अहवाल राज्य शासनाला दिला. एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारने बांठिया आयोगाने दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. याचबरोबर 15 दिवसांत निवडणूकीचा कार्यक्रम राबविण्याचा सूचनाही दिल्या. यानिर्णयामुळे महापालिकेने यापूर्वी ओबीसी शिवाय काढलेले आरक्षण रद्द झाले.
तसेच राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी शुक्रवारी (22) कोल्हापूर महापालिकेसह राज्यातील 13 महापालिका निवडणूकीसाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार शुक्रवारी (29) सकाळी 11 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह येथे कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठीचे आरक्षण सोडत निघणार आहे. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान, काढण्यात आलेल्या आरक्षणवर हरकती, सूचना स्विकारल्या जाणार असून 5 ऑगस्टला अंतिम आरक्षण प्रभागनिहाय राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. 22 प्रभागामध्ये ओबीसीसाठी आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जाती 12 आणि अनुसूचित जमातीचे 1 जागेसाठी यापूर्वी काढलेले आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. 13 प्रभागातील आरक्षण कायम राहणार असून उर्वरीत 79 प्रभागात ओबीसी, ओबीसी महिला, ओपन महिलांसाठी आरक्षण काढले जाणार आहे. यामधील शिल्लक राहणारे प्रभागात ओपन (सर्वसाधारण) असणार आहेत.
आरक्षण सोडत कार्यक्रम
आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात नोटीस प्रसिद्ध करणे – 26 जुलै (मंगळवार)
आरक्षण सोडत काढणे – 29 जुलै (शुक्रवार)
सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे – 30 जुलै (शनिवार)
निश्चित केलेल्या आरक्षणावर हरकती व सूचना घेणे – 30 जुलै ते 2 ऑगस्ट
हरकती, सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे – 5 ऑगस्ट 2022
एकूण वॉर्ड-31
त्रिसदस्यीय प्रभाग-30
द्विसदस्यीय प्रभाग-1
एकूण जागा -92
सर्वसाधारण (ओपन)-28
सर्वसाधारण महिला -29
अनुसूचित जाती -6
अनुसूचित जाती महिला -6
अनुसूचित जमाती ओपन -1
नागरिकांचा मागास प्रवर्ग -11
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-11