बेळगाव :
मोबाईल वापराचे प्रमाण कमी करून पुस्तक वाचण्याची आवड वाढविण्याच्या हेतूने सरकारने ‘मोबाईल सोडा, पुस्तक धरा’ हे अभियान सुरू केले आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये शनिवारी हे अभियान राबविण्यात आले. यावेळी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीषा नेसरकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करून कृती केल्यास विद्यार्थी मोबाईलपासून परावृत्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी जुनी व चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. मुले आपल्याला हातात घेत नाहीत याचे दु:ख पुस्तकांना आहेच. पुस्तके कपाटात बंद होण्यासाठी नसून पुस्तक वाचनाने परिवर्तन होते. भारतीय भाषा या वैभवशाली भाषा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठीसह कानडी व अन्य भाषांचा अभ्यास करायला हवा. यावेळी कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत वाघमारे व संजय कामत यांनीही मनोगत व्यक्त केले. एमए व पीएचडीचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.









