स्वराज्य युवा दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन
बेळगाव : सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. तरी विद्यार्थ्यांना वेळेत बस सोडत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. याची त्वरित दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रमाणात बसव्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करत स्वराज्य युवा दलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस सोडल्या जात नसल्याने मोजक्याच बसेसच्या आधारावर रहावे लागत आहे. त्या बसही प्रवाशांनी तुडुंब भरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजावर लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. कमी प्रमाणात बस सोडल्या जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. बस तुडुंब भरून येत असल्याने विद्यार्थ्यांना बसस्थानकावर बस थांबविली जात नाही. त्यामुळे बस पकडण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. शिक्षणाबरोबरच बससाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. वेळेत बस सोडल्या जात नसल्याने शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेत त्यांच्यासाठी सकाळी व संध्याकाळी बस फेऱ्या अधिक सोडाव्यात, अशी मागणीही करण्यात आली. चन्नम्मा चौकातून मोर्चाने येऊन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत सुरळीत बस सोडण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे शिरस्तेदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वराज्य युवा दलाचे कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.









