संयुक्त राष्ट्रसंघात भारताची पाकिस्तानला ताकीद : दरवेळी दिशाभूल करण्याचा प्रकार
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
भारताने पुन्हा एकदा काश्मीवरून पाकिस्तानला ताकीद दिली आहे. वारंवार काश्मीर राग आळवण्याऐवजी पाकिस्तानने स्वत:च्या स्थितीवर लक्ष द्यावे असे भारताने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात शुक्रवारी एका बैठकीदरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी आर. मधुसूदन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अन्य देशांच्या शिष्टमंडळांनी आमच्या देशावर आरोप करण्याऐवजी स्वत:च्या देशातील मुद्द्यांवर लक्ष दिल्यास सुरक्षा परिषदेच्या वेळेचा योग्य वापर होऊ शकणार आहे. एका शिष्टमंडळने पुन्हा एकदा या व्यासपीठाचा वापर अन्नसुरक्षेसारख्या आवश्यक मुद्द्यावरून लक्ष भटकविण्यासाठी केला आहे. पाकिस्तान वारंवार स्वत:च्या अजेंड्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याच आरोप मधुसूदन यांनी केला आहे.
भारतावर आरोप करणे थांबवा
स्वत:चा चुकीचा हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाची मदत घेणाऱ्या लोकांसोबत चर्चा करण्याचा कुठलाच अर्थ नाही. पाकिस्तानने भारतावर आरोप करण्याऐवजी स्वत:च्या देशातील समस्यांवर लक्ष देण्याची गरज आहे. जम्मू-काश्मीर भारताचा हिस्सा आहे आणि कायम राहणार असल्याचे मधुसूदन यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तान कट्टरतेत बुडालेले
यापूर्वी जुलै महिन्यातही भारताने सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला सुनावले होते. ब्रिटनमध्ये झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर भारताने प्रत्युत्तर दिले होते. लडाख आणि जम्मू-काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य हिस्सा होते आणि भविष्यातही राहणार आहेत. यावर पाकिस्तान कोणता विचार करतो याने कुठलाच फरक पडत नाही. सुरक्षा परिषदेत एका शिष्टमंडळाने माझ्या देशाविरोधात गरळ ओकली आहे. आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही. जे लोक स्वत: कट्टरतेत बुडाले आहेत, ते भारतातील समाजा आणि विविध समुदायांच्या लोकांच्या एकतेला समजू शकत नाहीत अशा शब्दांत भारताचे प्रतिनिधी आशीष शर्मा यांनी पाकिस्तानला सुनावले होते.
पाकिस्तानची चर्चेची तयारी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. ज्याच्यासोबत आम्ही तीन युद्धे लढलो, त्याच्यासोबत चर्चा करण्याची आमची इच्छा आहे. गंभीर मुद्द्यांवर समोरच्याने गांभीर्याने चर्चा करणे आवश्यक आहे. युद्धामुळे कुठल्याही मुद्द्यावर तोडगा निघू शकत नाही. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत असे शाहबाज यांनी म्हटले होते. तर भारताने सीमापार दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानसोबत चर्चा करणार नसल्याची भूमिका कायम ठेवली आहे.









