विद्यार्थ्यांचा धोका पत्करुन प्रवास : परिवहनने दखल घेण्याची मागणी
वार्ताहर /नंदगड
बिडी-बेकवाड-नंदगड रस्त्यावर बस अभावामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना धोका पत्करुन बसचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बिडी-नंदगड रस्त्यावर जादा बसेस सोडण्याची मागणी होत आहे. बिडी-बेकवाड-नंदगड भागातील 500 हून अधिक विद्यार्थी नंदगड, खानापूर व बेळगाव येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. हल्याळ-अळणावरहून येणाऱ्या बसेस बिडी येथील बसथांब्यावरून काही विद्यार्थी घेऊन येतात. पुढे बेकवाड-नंदगड येथे बस गच्च भरल्याचे कारण पुढे करून बसेस थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे सकाळी 8 वाजता बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास बस न मिळाल्याने बसथांब्यावरच थांबून राहण्याची परिस्थिती येत आहे. त्यामुळे साहजिकच दोन वर्ग बुडाल्याने पुन्हा घरी जाण्याची परिस्थिती विद्यार्थ्यांवर येत आहे. त्यातच आता महिला व मुलींसाठी शासकीय बससेवा विना तिकिटाची राहिल्याने महिला व मुली बसने प्रवास करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकाळी लवकर शाळा-महाविद्यालयांना जावे लागते. बस वेळेत न मिळाल्यास शिक्षणावर परिणाम होत आहे. प्रत्येक गावच्या बसथांब्यावर विद्यार्थ्यांची बस न मिळाल्याने गर्दी असते. बस वेळेत न मिळाल्याने बिडी, बेकवाड, झुंजवाड, नंदगड, हेब्बाळ, लालवाडी, झाडनावगा, कौंदल, करंबळ बसथांब्यावर बराच वेळ बसच्या प्रतीक्षेत थांबतात. अशीच परिस्थिती मेरडा, हलगा, हलशी, नंदगड बसथांब्यावर दिसून येते.विद्यार्थ्यांनाही बससेवेअभावी गैरसोय होते. पुरुष प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मात्र याची मोठी समस्या होत आहे.
बेकवाड क्रॉसवरील आंदोलनाची आठवण
बेकवाड क्रॉसवर चार वर्षापूर्वी जलद बसेस थांबत नसल्याने एका विद्यार्थ्याने स्वत:च्या जीवाचा धोका पत्करुन बस अडविण्याचा प्रयत्न केला होता. बसचालकाने बस न थांबविल्याने दुसऱ्या दिवशी बेकवाड बसथांब्यावर उग्र आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर मात्र जलद बसेस बेकवाड क्रॉसवर थांबू लागल्या. यामुळे बेकवाड परिसरातील जवळपास सात ते आठ गावच्या विद्यार्थी व प्रवासीवर्गाची चांगली सोय झाली होती. परंतु आता बस गच्च भरल्याचे कारण पुढे करून काही बसेस थांबत नसल्याने पुन्हा येथील नगरिक संतप्त बनले आहेत. परिवहन मंडळाने या रस्त्यावर जादा बसेस सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
नागरगाळी-खानापूर रस्त्यावर बस साडा
नागरगाळी-नंदगड-खानापूर रस्त्यावर वाढत्या प्रवासीवर्गांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावरची जादा बसेस सोडण्याची विनंती विद्यार्थी व पालकवर्गातून करण्यात येत आहे.









