खासगी वाहनांचा आधार घेत असल्याने आर्थिक भुर्दंड
बेळगाव : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये परिवहन मंडळाची बससेवा सुरळीतपणे होत नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बससाठी पायपीट करावी लागत आहे. दिवसभर बसची वाट पाहात बसस्थानकावर बसावे लागत आहे. यासाठी परिवहन मंडळाकडून बससेवा सुरळीतपणे करण्यात यावी, अशी मागणी करत कर्नाटक भीमसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव जिल्ह्यासह विविध तालुक्यात सुरळीत बससेवा नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आल्यानंतर यात अधिक भर पडली आहे. बैलहोंगल व खानापूर तालुक्यांमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बससाठी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. दुर्गम भागात असणाऱ्या गावांना वेळेत बस सोडली जात नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सरकार विद्यार्थ्यांसाठी बसपास देत असले तरी त्याचा कोणताच उपयोग होत नाही. बस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी अधिक बस सोडून होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी प्रवीण मादार, अक्षय के. आर., मल्लाप्पा अक्कमडी, अजय शिंगे, विजय कोटकार उपस्थित होते.









