पद्मश्री विनायकराव खेडेकर यांचे आवाहन : प्रसिद्ध रंगकर्मी देविदास आमोणकर यांना कृतज्ञता सन्मान प्रदान
पणजी : सांस्कृतिक क्षेत्रात प्रदूषण आहे ते बाजूला ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोक संस्कृतीचे व्यासंगी तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायकराव खेडेकर यांनी केले. मराठी नाट्यासृष्टीचे खरे आद्य जनक हे आपले कृष्णंभट बानकरच होते आणि ‘ऊपडी’ मध्ये सुखठणकरांनी हे सिद्ध करून दाखविले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पद्मश्री खेडेकर सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न सम्राट क्लब माशेलने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी)सभागृहात मंगळवारी आयोजित केलेल्या गोमंत रंगभूमी दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे दै. तरुण भारतचे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, सम्राट क्लब इंटरनॅशनलचे राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर, भूतपूर्व अध्यक्ष दीपक नार्वेकर, गट अध्यक्ष भाग्यरेखा गावस, कृतज्ञता सन्मानाचे यंदाचे मानकरी प्रसिद्ध रंगकर्मी देविदास आमोणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वेश फुलारी, सम्राट क्लब माशेलचे भावी अध्यक्ष मनोजकुमार घाडी व मनोज कारापूरकर आदी मंडळी उपस्थित होती. देविदास आमोणकर यांचा यावेळी पद्मश्री खेडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गोविंद भगत यांनी मानपत्राचे लेखन व वाचन केले. ज्यांची जयंती गोमंत रंगभूमीदिन म्हणून साजरा केला जातो त्या संतकवी तथा आद्यनाटककार कृष्णंभट बानकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून सोहळ्dयाला प्रारंभ करण्यात आला. देविदास यांच्यासारख्या कलाकारांनी नाटक हे व्रत म्हणून स्वीकारले व अनुष्ठान म्हणून त्याचे आचरण केले, असे खेडेकर म्हणाले.
राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी मी गेली अनेक वर्षे शिफारस देत आलो आहे. त्या फॉर्ममध्ये नवीन कलम टाकले आहे. त्यानुसार शिफारस केलेला कलाकार कोणत्या मतदारसंघातील हे नमूद करावे लागते म्हणजे, त्याप्रमाणे गाळणी लावून हवे त्या मतदारसंघातील कलाकार निवडले जातात.
-पद्मश्री विनायकराव खेडेकर.
मी सुरुवात केली होती तेव्हा या क्षेत्रात अशा प्रकारे लोकमान्यता मिळेल, असे वाटले नव्हते. नॅशनल थिएटरमध्ये नाट्याप्रयोग व्हायचे तिथे आम्ही चणे फुटाणे विकायचो. माझे यश बघायला माझे वडील हवे होते, असे भावोद्गार देविदास आमोणकर यांनी काढले. संस्कृतीची नाळ जपणाऱ्या संस्थेतर्फे आणि व्यासंगी व्यक्तीच्या हस्ते माझा सन्मान होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.
खेडेकर सदस्य सचिव असताना कला अकादमीत कलाकारांची मांदियाळी होती. आता कलाकारांऐवजी नकलाकारच तिथे जास्त दिसतात.
देविदास आमोणकर
शैलेश बोरकर दीपक नार्वेकर यांनी विचार मांडले मनोजकुमार घाडी यानी स्वागत केले. सर्वेश फुलारी यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्कृती क्षेत्रात मोठं कार्य करणाऱ्या साम्राटांचा सम्राट म्हणजे सम्राट क्लब आहे असे नमूद करून सागर जावडेकर यांनी, या संस्थेने कृष्णंभट बानकर यांची आठवण ठेवून हा सोहळा घडवून आणला याचे कौतुक केले. आणि जिद्द, चिकाटी व ध्येय बाळगून वर आलेल्या देविदास आमोणकर यांना हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, इतर संस्थापेक्षा इतर उपक्रम सम्राट क्लब राबवित आहे आणि पोर्तुगीज राजवटीत सुद्धा गोव्यात नाट्यापरंपरा टिकून आहे. मात्र अनेक माध्यमांच्या माऱ्यामुळे प्रेक्षक काहीसे नाटकापासून दूर जात आहेत. डॉ. रश्मिता आमोणकर व सुयोग पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. काजल चोडणकर, प्रतिभा गावकर, अनुश्री मणेरकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. मनोज कारापूरकर यांनी आभार मानले. या सोहळ्याला माजी आमदार तथा सम्राट इंटरनॅशनल क्लबचे संचालक धर्मा चोडणकर उपस्थित होते.









