ऋषि सुनक यांची संधी हुकलीच, बोरीस जॉन्सन यांचा पदत्याग
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी हुजूर पक्षाच्या लीझ ट्रस यांचा शपथविधी झाला आहे. मावळते पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर कोरोना काळात नियम मोडून पार्टी केल्यामुळे पद सोडण्याची वेळ आल्याने नव्या पंतप्रधानाचा शोध या पक्षाकडून घेण्यात येत होता. अनेक स्पर्धकांना मागे टाकून अखेर ट्रस यांनी बाजी मारली.

भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे देखील या स्पर्धेत होते. ते जॉन्सन मंत्रिमंडळात अर्थमंत्री आणि कोशागार प्रमुख होते. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जॉन्सन यांना विरोध केला होता. प्रारंभीच्या काळात सुनक अन्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आघाडीवर होते. तथापि, नंतर ते मागे पडत गेले. माजी पंतप्रधान जॉन्सन यांनीही लीझ ट्रस यांना पाठिंबा घोषित केल्याने ट्रस यांचे पारडे जड झाले होते. अखेर ट्रस यांनी सुनक यांना बरेच मागे टाकत अंतिमतः ही स्पर्धा जिंकली.
स्कॉटलंडच्या राजवाडय़ात शपथविधी
पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून ट्रस यांना पक्षाची मान्यता मिळल्यानंतर मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साधारणतः पाच वाजता बिटनच्या महारणी क्विन एलिझाबेथ (दुसऱया) यांच्या स्कॉटलंडमधील राजवाडय़ात ट्रस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ महाराणींकडून देण्यात आली. सर्वसाधारणपणे कोणत्याही ब्रिटीश पंतप्रधानाचा शपथविधी लंडनच्या ऐतिहासिक बकिंगहॅम राजवाडय़ात होतो. तथापि, महाराणी एलिझाबेथ 96 वर्षांच्या असून व्याधीग्रस्त असल्याने त्यांना बकिंगहॅम राजवाडय़ात आणता आले नाही. त्यामुळे त्यांचे वास्तव्य असलेल्या स्कॉटलंड येथील राजवाडय़ातच शपथविधी झाला.
सुनक यांना संधी नाही
जॉन्सन यांना विरोध केल्यामुळे सुनक यांना ट्रस यांच्या मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाही, असे वृत्त बिटनच्या काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. कोरोना काळात ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीच्या झाकोळातून बाहेर काढण्यात सुनक यांचे मोठे योगदान होते. यासाठी त्यांची जगभरात प्रशंसाही झाली होती. तथापि, या बळावर त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा बाळगल्याने आज त्यांना राजकीय विजनवासात जावे लागेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंत्र्यांची नावे निश्चित
ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत, असे वृत्त आहे. चार महत्वाचे विभाग अश्वेत सदस्यांना देण्यात येणार असून त्यांची नावेही निश्चित झाली आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अश्वेत सदस्यांपैकी भारतीय वंशाचे किती आणि कोण सदस्य आहेत, यासंबंधी आता उत्सुकता आहे.
जॉन्सन यांचा संदेश
ट्रस यांचा शपथविधी होण्यापूर्वी माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदावरील त्यांचे अखेरचे भाषण केले. हे भाषण त्यांनी त्यांचे अधिकृत सरकारी निवासस्थान ‘टेन डाऊनिंग स्ट्रीट’ येथे केले. ते जगभरात प्रसारित करण्यात आले. भाषणानंतर त्यांनी पत्नी केरी यांच्यासह स्कॉटलंड येथील महाराणींच्या बाल्मोरल कॅसल या राजवाडय़ात पोहचले आणि त्यांनी त्यागपत्र महाराणींना सोपविले.
38 मिनीटे ब्रिटन पंतप्रधानाविना
मावळते पंतप्रधान जॉन्सन आणि उगवत्या पंतप्रधान ट्रस हे दोघे एकाचवेळी महाराणींकडे पोहचले नाहीत. जॉन्सन काही मिनिटे आधी पोहचले आणि त्यांनी राजीनामा सोपविला. तो संमत करण्यात आला. नंतर जवळपास 38 मिनिटांनी ट्रस यांचा शपथविधी झाला. त्यामुळे ब्रिटन 38 मिनीटे पंतप्रधानांवाचून होता. ब्रिटीश लोकशाहीच्या साडेतीन शतकांच्या इतिहासात असे क्वचित घडले आहे.
भारताशी संबंध कसे राहतील ?
ड नव्या ब्रिटीश पंतप्रधान लीझ ट्रस यांच्यासंबंधी भारतात उत्सुकता
ड जॉन्सन यांच्याप्रमाणेच भारताशी संबंध राहतील का हा मुख्य मुद्दा
ड नव्या पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळाची घोषणा अल्पावधीतच होणे शक्य
ड नव्या मंत्रिमंडळात ऋषि सुनक यांना स्थान नाही ः सूत्रांची माहिती









