शालेय शिक्षणामध्ये ठराविक विषय शिकवले जातात परंतु त्यामध्ये जो विषय आयुष्यभरासाठी उपयोगी असतो, तो ‘वेळेचे नियोजन’ हा विषय शिकवला जात नाही. तो विषय पालकांनी शिकवावा लागतो किंवा पालकांना वेळ नसल्यास अनुभवातून शिकावा लागतो. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा वेळेचे नियोजन शिकवण्यासाठी खरे तर शाळेमध्ये बाहेरून कोणी निमंत्रित व्याख्याता बोलवावा ज्याने विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना या प्रश्नाची उकल करावी. तीन तासामध्ये भाषा विषयाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहिताना अनेक अडचणी येतात परंतु त्या विद्यार्थ्यांना आपापल्या समजुतीनुसार सोडवाव्या लागतात. प्रश्न फक्त तीन अथवा दोन तासांच्या परीक्षेचा नाही, प्रत्येक वर्षाचा आहे, महिन्याचा आहे, दिवसाचा आहे. देशाची पंचवार्षिक योजना यासंबंधी अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे परंतु त्याचा स्वतःच्या आयुष्यात कसा वापर करावा याविषयी कोणत्याही पुस्तकात भाष्य नाही. नव-वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने वेळेचे नियोजन आजपासूनच करता येईल.
वर्षाच्या 365 (किंवा 366) दिवसात आपण काय करणार आहोत, याचे नियोजन करण्यासाठी डायरी लिहिण्याची सवय लावून घेता येते. डायरीचा अनेक प्रकारे वापर करता येतो. दिवसभरात काय केले याबद्दल म्हणजेच भूतकाळाबद्दल लिहिणे किंवा पुढील महिन्यात/आठवडय़ात काय करणार याबद्दल डायरी लिहिणे. आपले विचार शब्दबद्ध करण्यासाठी डायरीचा वापर करतात, जमा खर्च आणि आर्थिक नियोजनासाठी डायरी लिहिली जाते. परंतु तूर्त शालेय-महाविद्यालयीन जीवनात डायरी कशी लिहिता येईल, त्याचा उपयोग काय यावर उहापोह करता येईल. भूतकाळात काय केले याची नोंद ठेवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी पुढील आठवडय़ात आपण काय करणार आहोत याचे नियोजन डायरीमध्ये लिहिण्याची सवय लावून घ्यावी. दहावीच्या विद्यार्थ्यांना उर्वरित 60 दिवसांचे नियोजन करता येईल. उद्या आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत याचे सहसा नियोजन केले जात नाही, त्यामुळे आवडत्या विषयांचाच अभ्यास होतो. म्हणूनच न आवडणाऱया विषयांची पुस्तके वर्ष संपत आले तरी नवी कोरीच राहतात. यावर उपाय एकच. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस एका विषयासाठी द्यावा आणि त्याचे नियोजन डायरीमध्ये लिहून ठेवावे. विद्यार्थ्यांचा बराच वेळ लिखाणामध्ये जातो. पुस्तक-गाईड बघून गृहपाठ करण्याला कॉपी करणे म्हणता येईल, तो स्व-अभ्यास नव्हे. त्यामुळे स्व-अभ्यासाच्या नियोजनासाठी डायरी लिहिता येईल.
आठवडय़ाचे-महिन्याचे नियोजन केल्यानंतर प्रश्न येतो दिवसभराच्या नियोजनाचा.दिवसाच्या 24 तासांपैकी आपले किती तास झोप घेण्यात-व्यक्तिगत स्वच्छता-घरकाम-जेवण-खाण्यामध्ये जातात याची सर्वसाधारणपणे प्रत्येकास कल्पना असते. शाळा-महाविद्यालयात किती वेळ जातो, प्रवासामध्ये किती वेळ जातो याचे गणित मांडल्यास स्व-अभ्यास म्हणजेच वाचन करण्यासाठी किती वेळ उपलब्ध आहे याचे अवलोकन पालकांनी करावे. शहरातील अनेक पालक आपल्या पाल्याची गुणवत्ता वाढावी यासाठी क्लासमध्ये नाव नोंदणी करतात. अनेक विद्यार्थ्यांचा दिवसभरातला 80 टक्के वेळ शाळा आणि क्लास यामध्ये जात असल्यामुळे त्यांना स्व-अभ्यासाला वेळ मिळत नसल्याचे निदर्शनास आले. याचा अर्थ पालकांनी वेळेचे नियोजन केलेले नाही, ज्याचे दुष्परिणाम मुला-मुलींना भोगावे लागत आहेत. दिवसभराच्या नियोजनामध्ये खेळाचा समावेश असायलाच हवा. पुणे-मुंबईसारख्या शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या दारात शाळेची बस येत असते. त्यामुळे चालण्या-पळण्यालाही अनेक विद्यार्थी पारखे झाले आहेत. शहरातील अनेक विद्यार्थी आपल्या सोसायटय़ांच्या बाहेर खेळावयास जात नाहीत. त्यातही अनेक मैदानी खेळ अनेक सोसायटय़ामध्ये-शाळांमध्ये खेळले जात नाहीत. आठवी-नववी-दहावीचे चार-पाच मित्र-मैत्रिणी मोबाईलवर सामुहिक खेळ बसल्या बसल्या खेळत असतात. अनेक शाळांमध्ये खेळाचे साहित्य नाही. त्यामुळे अनेक मैदानी खेळ खेळले जात नाहीत. त्या खेळांचा परिचय होण्यासाठी निदान असे खेळ खेळण्याचे नियोजन शाळा आणि पालकांनी करावे. दरवषी किमान एक खेळ त्या खेळाच्या नियमांसह शिकण्याचा प्रयत्न करता येईल. एका विद्यार्थ्याला बुद्धिबळाची आवड जोपासण्याची इच्छा होती, तो उत्तम बुद्धिबळ खेळत होता परंतु त्याच्या पालकांनी आठवीमध्ये त्याचे बुद्धिबळाच्या ‘कोच’कडून मिळणारे मार्गदर्शन बंद करून आय.आय.टी.-जे.ई.ई.च्या पूर्वतयारीच्या क्लासमध्ये नाव नोंदवले. आठवीपासून क्लासच्या चक्रात अडकलेल्या बालकांचा सर्वांगीण विकास बंद होतो. पाल्याच्या भवितव्यासाठी नियोजन करताना विविध विषयांचा परिचय करून देणे की क्लासला नाव नोंदवणे या संभ्रमात आर्थिक परिस्थिती उत्तम असलेले स्वतःचा वेळ खर्च करण्याऐवजी पैसे खर्च करण्याचा मार्ग निवडतात. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट बघणे, संगीत ऐकणे, संग्रहालय बघणे, स्वयंपाक करणे, झाडे-प्राणी-पक्षी यांची माहिती घेता घेता निसर्गामध्ये मनसोक्त भटकणे याचे नियोजन पालकांनी केल्याशिवाय पाल्याला त्या विषयांची तोंडओळख होत नाही. विद्यार्थ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहेच परंतु पालकांनीही नियोजनपूर्वक काही कृती करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ दरमहा एक पुस्तक खरेदी करण्याचे नियोजन पालकांनी केले तरच घरातल्या पुढच्या पिढीला वाचनाची आवड लागू शकते. मोबाईलवर दहा-वीस हजार रुपये खर्च करणारे पालक पुस्तक खरेदीचा विचारही करत नाहीत. त्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागत आहेत. दरमहा एक पुस्तक खरेदी, एक नाटक, एक चित्रपट, एक प्रदर्शन/संग्रहालय, एक संगीत मैफल, दरवषी एका नवीन ठिकाणी प्रवास असे नियोजन पालक करू शकतात.
दिवसाच्या नियोजनाबरोबरच तासाचे नियोजन विद्यार्थ्यांनी करावे. शास्त्र-विज्ञान यांच्या आकृत्या काढण्यासाठी किती वेळ लागतो, तीन पानी निबंध लिहिण्यासाठी किती वेळ लागतो, पत्र-लेखन दहा ते बारा मिनिटात होते की नाही याची शहानिशा विद्यार्थ्यांनी करावी आणि तशी डायरीमध्ये नोंद करावी. कोणत्या विषयाच्या परीक्षेसाठी वेळ अपुरा पडतो, यावर विचार केल्यास वेळेच्या नियोजनाचा अभाव, असेच अनुमान काढावे लागते. एका तासामध्ये किती पाने वाचून होतात त्याचे सर्वसाधारण भान ठेवावे.
एक पूर्ण पान लिहिण्यासाठी किती वेळ लागतो याचा पडताळा घडय़ाळ समोर ठेवून करावा. एकाच ठिकाणी एकाग्र चित्ताने बसून वाचन-श्रवण यासारखी कोणतीही कृती करण्याची आपली क्षमता कमी झाली आहे त्यामुळे एका तासात किती पाने वाचून होतात याची दररोज नोंद ठेवल्यास नेमके पाणी कुठे मुरते आहे, याचे उत्तर मिळेल. एकूणच प्रश्न घडय़ाळय़ाच्या काटय़ाबरोबर राहण्याचा नसून उपलब्ध वेळेत बरेच काही करता येते, त्याबद्दल विचार करण्याचा आहे.
-सुहास किर्लोस्कर








