सदाशिवनगरमध्ये लाखो लिटर पाणी वाया : नागरिक संतप्त, एलअॅण्डटी सुस्त
बेळगाव : पावसाने ओढ दिल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मात्र दररोज जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत शहरवासियांतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सदाशिवनगर-रेलनगर परिसरात जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. एलअॅण्डटी कंपनीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. शहरात दररोज कोठे ना कोठे पाणी वाया जात आहे. याबाबत पाणीपुरवठा कंपनी उदासीन असल्याचे दिसत आहे. मात्र याचा फटका शहरवासियांना बसू लागला आहे. एकीकडे पाणीपुरवठा कंपनी पाणी जपून वापरा, असा संदेश देत आहे तर दुसरीकडे वाया जाणाऱ्या पाण्याकडे कंपनीचेच दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे दिव्याखाली अंधार असे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात जलवाहिन्या, व्हॉल्व्ह आणि नळांना गळती लागून दररोज पाण्याचा मोठा अपव्यय होऊ लागला आहे. तातडीने दुरुस्ती होत नसल्याने पाणी वाया जाऊ लागले आहे. शहरात आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. तर दुसरीकडे गळती लागून पाणी वाया जाऊ लागले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कंपनीसमोर पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच पाणी वाया जाऊ लागल्याने शहरवासियांना पाण्याची टंचाई अधिक तीव्र जाणवू लागली आहे. तातडीने गळत्या दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जलवाहिनी, व्हॉल्व्ह आणि नळांना गळती लागून दररोज पाच टक्के पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकूणच पाणीपुरवठ्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत घट झाल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अशातच विनाकारण पाणी वाया जावू लागल्याने परिस्थिती गंभीर बनणार आहे.









