दोन कर्मचारी बेशुद्ध : यंत्रणांची धावपळ
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या विमानतळावर किरणोत्सर्गी घटकाची गळती झाल्याची बातमी समोर आली आहे. लखनौच्या सरोजिनीनगर विमानतळाच्या कार्गो विभागात किरणीत्सर्गी पदार्थाची गळती झाल्याने यंत्रणांची बरीच धावपळ उडाली. घटनास्थळावरून लोकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. यादरम्यान 2 कर्मचारी बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर टर्मिनल-3 सीआयएसएफ आणि एनडीआरएफकडे सोपवण्यात आले. लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला. तसेच जवळपास दीड किमीचा परिसर रिकामा करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, विमानतळ टर्मिनल-3 येथे लखनौहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात माल भरतेवेळी स्कॅनिंग सुरू असताना मशीनने बीपिंगचा आवाज केला. या बॉक्समध्ये पॅन्सरविरोधी औषधे लाकडी पेटीत भरलेली होती. त्यात किरणोत्सर्गी घटक असतात. कर्मचाऱ्यांनी पेटी उघडताच वेगाने गॅस बाहेर आल्यामुळे दोन कर्मचारी बेशुद्ध झाले. कर्मचारी बेशुद्ध होताच तेथे चेंगराचेंगरी झाली. लोक इकडे तिकडे धावू लागले. त्यानंतर हा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहून अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या 3 तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या. खबरदारी म्हणून त्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, विमानतळावरील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.









