मोठय़ा प्रमाणात पाणी वाया : दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पंपिंग स्टेशनमधून लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला विजयनगर येथे गळती लागली. शहराला पाणीपुरवठा करणाऱया मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. याठिकाणी सातत्याने गळती लागत असून गळतीचे प्रमाण कमी असल्याने वेळीच दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
हिंडलगा पंपिंग स्टेशनमधून लक्ष्मीटेकडी येथे सहाशे अश्वशक्तीच्या विद्युतपंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण विजयनगर येथे जलवाहिनी वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत. बेळगाव-वेंगुर्ला रोडवर विजयनगर परिसरात जलवाहिनीला गळती लागली आहे. सध्या सदर गळती लहान स्वरुपात आहे. पण याठिकाणी सातत्याने गळती लागत असल्याने पाणी वाया जात आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरून अवजड वाहने ये-जा करीत असल्याने जलवाहिनीला गळती लागत आहे.
पाणीटंचाईच्या काळातच या जलवाहिनीला गळती लागते. परिणामी नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावते. सध्या शहरवासियांना पाण्याची समस्या भेडसावत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हिंडलगा पंपिंग स्टेशन ते लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचे अंतर तीन किलोमीटर असून विजयनगर येथे मोठी चढती आहे. त्यामुळे पंप बंद झाल्यानंतर मोठय़ा आकाराच्या जलवाहिनीमधील पाणी पुन्हा पंपिंग स्टेशनमध्ये माघारी जाते. त्यामुळे दाबाने जलवाहिन्यांना गळती लागत आहे. सदर गळतीचे निवारण करून पाणीटंचाई टाळावी, अशी मागणी होत आहे.









