लाखो लिटर पाणी वाया : पाणीपुरवठा मंडळाच्या दुर्लक्षामुळे नाराजी
बेळगाव : चन्नम्मा चौक येथील गणपती मंदिर शेजारी असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल येथे जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गणपती मंदिर शेजारी असणाऱ्या रिक्षा स्टँडजवळील सिव्हिल हॉस्पिटलच्या संरक्षण भिंतीजवळ विकासकामे राबविण्यात आली आहेत. या दरम्यान येथून गेलेल्या जलवाहिनीला गळती लागली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत रिक्षा चालकांकडून पाणीपुरवठा करणाऱ्या मंडळाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. मात्र याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सतत पाणी वाया जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची आतापासूनच बचत केली जात आहे. शहरवासियांना तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असे असताना जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शहरवासियांतून पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाया जाणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी जवळच असणाऱ्या शौचालय चालकाकडून मोटर बसवून पाण्याचा उपयोग केला जात आहे. जवळपास चार महिन्यांपासून जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा मंडळ कधी लक्ष देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.









