दैनंदिन कामकाजावर परिणाम : नागरिक- कर्मचाऱ्यांची गैरसोय
बेळगाव : ग्राम पंचायतींचा कारभार पाहणाऱ्या तालुका पंचायत इमारतीच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अशा परिस्थितीत काम करण्याची वेळ आली आहे. दरम्यान कार्यालयातच गळतीच्या ठिकाणी बादली ठेवण्यात आली आहे. येथे येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होऊ लागली आहे. एकीकडे प्रशासकीय कार्यालये स्मार्ट होऊ लागली आहेत. तर दुसरीकडे जुन्या इमारतींना गळती लागत असल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. यंदा जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारतींच्या गळतीचा प्रश्न समोर आला आहे. तालुका पंचायतमध्ये पाणी गळती होत असल्याने याचा दैनंदिन कामावर परिणाम होऊ लागला आहे. तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात 57 ग्राम पंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे गावगाड्यातील समस्या घेऊन येणाऱ्या ग्रा. पं. सदस्य आणि ग्रामस्थांची संख्याही मोठी आहे. मात्र कार्यालयात गळती सुरू असल्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनाही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. विशेषत: दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होत आहे. कर्मचाऱ्यांनाही या गळतीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गळती लागलेल्या छताकडे तालुका पंचायत लक्ष देणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.









