पाण्याचा अपव्यय : एलअँडटीचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरात जलवाहिन्यांना गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. काँग्रेस रोड येथील मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरू आहे. एकीकडे एलअँडटी कंपनीकडून 24 तास पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र वाया जाणारे पाणी थांबविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. एकीकडे शहरात एलअँडटीकडून 24 तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र शहरातील जलवाहिन्यांना लागलेली गळती थांबविण्यात अपयश येऊ लागले आहे. त्यामुळे विनाकारण दररोज कुठेना कुठे हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहेत. या प्रकारामुळे नागरिक संतप्त होऊ लागले आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र तेही अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरू आहे. काँग्रेस मेन रोडवरच जलवाहिनी दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला आहे. ही दुरुस्ती अर्धवट स्थितीत असल्याने या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी देखील धोका निर्माण झाला आहे.









