आज शहरात पाणीपुरवठ्यात व्यत्यय : दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला पाच्छापूर गावानजीक मोठी गळती लागली आहे. त्यामुळे एलअँडटीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून सोमवारी शहरात पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. यासाठी एलअँडटीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जुळवाजुळव केली जात आहे. दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास सायंकाळी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. शहराला हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. दररोज 18 एमजीडी म्हणजे 55 दशलक्ष लिटर पाणी पुरविले जाते. यापैकी बसवणकोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात 30 दशलक्ष लिटर तर 25 दशलक्ष लिटर पाणी लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण केंद्राला पुरविले जाते. त्याठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर शहराला पाणीपुरवठा केला जातो.
हिडकल जलाशयातून बेळगावला येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पाच्छापूर गावानजीकच्या ब्रिजजवळ रविवारी पहाटे चारच्या दरम्यान मोठी गळती लागली आहे. शेतवडीत जलवाहिनीला गळती लागल्याने एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत संबंधित शेतकऱ्याला ही माहिती दिली. शेतकऱ्याला विश्वासात घेत दुरुस्तीचे काम सकाळी हाती घेण्यात आले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून सध्या हिडकल जलाशयातून केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. राकसकोप जलाशयापेक्षा हिडकल जलाशयातूनच बेळगावला मोठ्या प्रमाणत पाणी येते. त्यामुळे शहरात सोमवारी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने एलअँडटीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असून त्याठिकाणी टँकरची जुळवाजुळव करण्याचे काम हाती घेण्यात आले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी सोमवारी दुपारपर्यंत दुरुस्ती पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मनपा आयुक्तांना माहिती
पाच्छापूरनजीक हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे समजताच एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर लागलीच ही माहिती एलअँडटीकडून महापालिका आयुक्त शुभा बी. यांना देण्यात आली. मनपा आयुक्तांनी ही माहिती प्रसार माध्यमांना कळविली.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न
पाच्छापूर गावानजीकच्या ब्रिजजवळील एका शेतात हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे सकाळपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सोमवारी शहरात पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास सायंकाळी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– धीरज उभयकर, व्यवस्थापक एलअँडटी









