वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राहुल गांधी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. मात्र, भाजपने या घोषणेची खिल्ली उडविली असून ही घोषणा म्हणजे विरोधी पक्षांच्या नाशाला निमंत्रण अशी टिप्पणीही केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा शब्दयुद्ध भडकले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा शनिवारी केली होती. त्यानंतर भाजपने एक व्यंगचित्र प्रसिद्ध करुन या घोषणेला प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना गेहलोत यांनी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार गांधी हेच होते आणि तेच असतील हे स्पष्ट केले होते. स्थानिक पातळीवर विविध पक्षांमध्ये बरेच मतभेद असतात. तथापि, आता विरोधी पक्षांवर परिस्थितीमुळे एकत्र येण्याचे मोठे दडपण आले आहे. त्यामुळे आघाडी होणार हे निश्चित आहे. आघाडीचा नेता कोण असणार हे आघाडीतील पक्ष चर्चा करुन ठरविणार आहेत. पण काँग्रेसची पंतप्रधानपदासंबंधीची भूमिका स्पष्ट आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
काँग्रेससह 26 विरोधी पक्षांनी आघाडी स्थापन करुन केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अद्याप ही आघाडी स्थिरस्थावर झालेली नाही. तसेच आघाडीचा नेता आणि पंतप्रधानपदाचा चेहराही ठरलेला नाही. यासंबंधात आघाडीत मतभेद असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये होणार आहे.









