विरोधी पक्षाचे खासदार प्रत्यक्ष पाहणी करणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमधील हिंसाचार अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. संसद अधिवेशनातही या मुद्द्यावरून सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. याचदरम्यान ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांची एक टीम 29-30 जुलै रोजी मणिपूरला भेट देणार असल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील आठवड्यात संसदेत होणाऱ्या विश्वासदर्शन ठरावावरील चर्चेत ठोस मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जाऊ शकतो. मणिपूरमधील हिंसाचारावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी झाली आहे. आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी गुऊवारी काळे कपडे परिधान करून संसदेच्या अधिवेशनात हजर राहिले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. सभागृहाची कार्यवाही गांभीर्याने केली जात नसल्याने आता निषेधासाठी नवीन पद्धती अवलंबवावी लागल्याचे चौधरी यांनी नमूद केले. मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. महिलांच्या विवस्त्र अवस्थेत व्हायरल झालेल्या व्हिडिओचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून 14 जणांची ओळख पटवली होती.
आतापर्यंत 160 हून अधिक मृत्यू
3 मे रोजी राज्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात अनेक जण जखमीही झाले आहेत. वास्तविक, मैतेई समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ डोंगराळ जिह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला. हळूहळू या निषेधाचे ऊपांतर हिंसाचारात झाल्यापासून राज्य अजूनही धगधगत आहे.









