Ajit Pawar : 2024 ला नाही तर मी आताच मुख्यमंत्री होणार असा आत्मविश्वास व्यक्त करून विरोधी पक्षनेते अजित पवार सूचक वक्तव्य केलं आहे. मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी पक्षातच राहणार आहे असा खुलासा केल्यानंतर अजित पवार यांनी आज प्रथमच सकाळ समुहाच्या ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीमध्ये सहभागी होऊन आपली दिशा स्पष्ट केली.
मागील काही दिवसांपासून अजित पवार महाराष्ट्रात राजकीय भूकंप करून भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा माध्यमांत फिरत होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी स्वता मी भाजपमध्ये जाणार नसून शेवटपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे असे जाहीर केले होते. त्यानंतर आज प्रथमच आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबद्दल इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीमध्ये अजित पवार यांना आपण दोन मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे पण आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी “क्लेम? २०२४ ला का ? आताच करणार!” असं विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे सभागृत एकच हशा पिकला. अजित पवारांनी हे विधान करून मुख्यमंत्रपदावर आपला अप्रत्यक्ष दावा केला आहे. या मुलाखतीमध्य़े महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडींवर चर्चा केली.