वृत्तसंस्था/ विशाखापटणम
इंग्लंडचा सर्वात अनुभवी स्पिनर जॅक लीच शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. हैदराबादमधील पहिल्या कसोटीवेळी त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
बुधवारी इंग्लंड संघाच्या सरावातही त्याने भाग घेतला नाही. तो फिजिओकडून उपचार करून घेत असल्याचे दिसून आले. ‘लीचीला दुखापत झाली असली तरी तो कणखर खेळाडू आहे. दुसऱ्या कसोटीत तो खेळणार नाही, असे निश्चितपणे आम्ही म्हणू शकत नाही. पुढच्या दोन दिवसात त्याची प्रगती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असे सलामीवीर झॅक क्रॉली म्हणाला.
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. वेदना होत असतानाही त्यांनी क्षेत्ररक्षण चालू ठेवणे पसंत केले आणि वेदनासह गोलंदाजी करीत त्याने पहिल्या डावात 26 तर दुसऱ्या डावात 10 षटके गोलंदाजी केली. सांध्याच्या भागात सूज आलेली असतानाही त्याने गोलंदाजी केली. बुधवारी सराव सत्र चालू असताना तो लंगडत असल्याचे दिसून आले.
लीचला झालेली दुखापत म्हणजे शोएब बशिरला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने बशिर हैदराबादमध्ये उशिरा दाखल झाला होता. बशिरला संधी मिळाल्यास तो उत्तम प्रदर्शन करेल, असा विश्वास क्रॉलीने व्यक्त केला आहे. तो एक प्रतिभावान गोलंदाज असून आपली क्षमता त्याला माहीत आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास तो नक्कीच चांगली कामगिरी करेल, असे क्रॉली म्हणाला.









