वायुदलप्रमुख चौधरी यांनी दिली माहिती : 83 विमानांच्या खरेदीसाठी करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मिग-21 लढाऊ विमान आता भारतीय वायुदलाचा हिस्सा असणार नाही. या लढाऊ विमानांची जागा एलसीए तेजस घेणार आहे. वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. तेजसच्या एलसीए मार्क-1एच्या 83 विमानांसाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. तेजस एलसीए मार्क-1ए या प्रकारातील एकूण 180 विमाने मिळविण्याची आमची इच्छा असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.
2025 पर्यंत मिग-21 लढाऊ विमानांचे उ•ाण आम्ही बंद करणार आहोत. त्यांची जागा एलसीए तेजस विमान घेणार आहे. एक महिन्याच्या आत एका मिग-21 स्क्वाड्रनला सेवेतून हटविण्यात येणार आहे. आम्ही 83 एलसीए मार्क 1 ए विमानांसाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या प्रकारातील आणखी 97 लढाऊ विमाने आम्हाला हवी आहेत, तसे चौधरी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे.
एलसीए मार्क-1ए हे तेजसचे अद्ययावत स्वरुप आहे. या लढाऊ विमानात अनेक आधुनिक उपकरणे जोडण्यात आली आहेत. रडार वॉर्निंग रिसिव्हर, स्वरक्षणासाठी जॅमर पॉड समवेत अनेक वैशिष्ट्यो यात सामील आहेत. हे विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी सर्वात अचूक अस्त्र आहे. तेजस एलसीए मार्क-1ए हे विमान एचएएलकडून निर्माण केले जाणार आहे. स्वत:च्या श्रेणीतील हे सर्वात कमी वजनाचे आणि सर्वात छोटे बहुउद्देशीय सुपरसोनिक लढाऊ विमान आहे. एलसीए मार्क-1ए सामील झाल्याने मिग-21 ची कमतरता भरून निघणार आहे.
शत्रूंशी करणार सामना
आम्ही गुप्त पद्धतीने आणि देखरेखीद्वारे सातत्याने सीमापारच्या स्थितीवर नजर ठेवून आहोत. आमच्या मोहिमात्मक योजना गतीशील असून स्थितींनुसार त्यात बदल केले जात आहेत. शत्रूला आम्ही उत्तम रणनीतिच्या माध्यमातून सामोरे जाण्याची तयारी करत आहोत. इनपुटनुसार स्वत:च्या आयएसआर योजनांमध्ये सातत्याने सुधारणा करत असतो, असे वायुदलप्रमुख चौधरी यांनी म्हटले आहे.
आव्हानांकरिता सैन्य सज्ज
आमच्या क्षेत्रात अस्थिर आणि अनिश्चित भू-राजनयिक स्थितीमुळे एका मजबूत आणि विश्वसनीय सैन्याची आवश्यकता अनिवार्य ठरली आहे. भारत-प्रशांत क्षेत्र जगातील नवे आर्थिक अणि रणनीतिक गुरुत्वाकर्षण केंद्र आहे. हे क्षेत्र आमच्यासमोर आव्हाने अन् संधी दोन्ही सादर करते. भारतीय वायुदल स्वत:च्या क्षमतसोबत सर्वात वेगाने पोहोचण्याची आणि सर्वात कठिण प्रहार करत या आव्हानांना सामोरे जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच क्षेत्रात भारताच्या सामर्थ्याचे सादरीकरण करणार असल्याचे चौधरी यांनी नमूद केले आहे.
एमआयएफएप्रकरणी निर्णयाची अपेक्षा
एमआयएफए (मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट) प्रकरण दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. रशियाकडून आम्हाला एस-400 मिसाइल सिस्टीमच्या तीन युनिट्स प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित दोन युनिट्स आगामी दोन वर्षापर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे ही सुरक्षा यंत्रणा मिळण्यास विलंब झाला आहे. भारतीय वायुदल पुढील 7-8 वर्षांमध्ये 2.5-3 लाख कोटी रुपयांच्या मिलिट्री प्लॅटफॉर्म, हार्डवेअरला सामील करण्याच्या योजनेवर विचार करत असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.
पाक-चीन भागीदारी
चीन आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होत आहे. पाकिस्तान जेएफ-17 लढाऊ विमानांची निर्मिती करत आहे. तर जे-10 विमानांना स्वत:च्या ताफ्यात सामील करत आहे. अशा स्थितीत जेथे तंत्रज्ञानाद्वारे हल्ला होईल, तेथे आम्ही तंत्रज्ञानाने प्रत्युत्तर देणार आहोत, असे वायुदलप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.









