राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड
बेळगाव : बेंगळूर येथे पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पदवीपूर्व कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत बेळगाव हलगा-बस्तवाडच्या लक्ष्मी संजय पाटील हिने हावेरीच्या ऐश्वर्या हिचा चीतपट करून सुवर्णपदक पटकावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. बेंगळूर येथे घेण्यात आलेल्या पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिल्या फेरीत लक्ष्मी पाटील हिने मंड्याच्या सुरक्षा हिचा 4 गुणासह चीतपट करून विजय संपादन केला. उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्मीने दावणगिरीच्या चंद्रम्माचा 6 गुणासह बायफॉल्ट विजय संपादन करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत लक्ष्मीने विजापूरच्या अपेक्षा तालिकोटीचा 4 गुणासह चीतपट करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत लक्ष्मीने हावेरीच्या ऐश्वर्याचा पहिल्या फेरीत 4-0 ची आघाडी मिळविली. दुसऱ्या फेरीत पुन्हा आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून ऐश्वर्याला चीतपट करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. यापूर्वीही दसरा कुस्ती स्पर्धेतसुद्धा महिलांच्या गटात तिने विजेतेपद पटकावित चांदीच्या गदेची मानकरी ठरली. तिला युवजन क्रीडा खाते हल्याळचे कुस्ती प्रशिक्षक तुकाराम गौडा यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. ती शिवाजी पदवीपूर्व महाविद्यालय हल्याळ येथे शिकत असून तिला वडील संजय पाटील यांचे प्रोत्साहन मिळत आहे. मान्यवरांच्या हस्ते चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला.









