माझ्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार कोरोनाकाळात आणि महापुराच्यावेळी कुठे होते ? असा प्रश्न काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला
शुक्रवार दि. ५ रोजी बेळगाव ग्रामीण काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बाळेकुंद्री खुर्द गावात रोड शो केला. यावेळी उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, माझ्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आता हल्लीच ४ महिन्यांपासून दिसत आहेत. जेव्हा मी राजहंसगडावर शिवरायांची भव्य मूर्ती स्थापित केली तेव्हा हे पोस्टर लावायला आले होते.
कोरोनाकाळात आणि महापुराच्यावेळी हे कुठे होते? कठीण काळात मी माझ्या कुवतीप्रमाणे जनसेवा केली आहे. वैद्यकीय सुविधा आणि राशन साहित्य पुरविले आहे. एरव्ही जनसेवेत न येणारे हे लोक निवडणूक संपल्यावर बेपत्ता होतील आणि त्यांचे मोबाईल देखील बंद होणार. आता मात्र निवडणुकीच्यावेळी येऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. पण मी मतदारसंघाचा विकास करून तुमच्या समोर उभी आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक रोड शो मध्ये सामील झाले होते.










