वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सध्या भारतामध्ये आयसीसीची पुरुषांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर आठवडाभराच्या कालावधीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेवेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाचे विद्यमान प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडचा बीसीसीआयबरोबरच्या कराराचा कालावधी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत राहणार असून त्यानंतर तो संपणार आहे. कदाचित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयकडून कदाचित द्रविडला प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्याची विनंती केली जाईल पण द्रविडकडून पुन्हा या पदासाठी अर्ज मागवला जाईल. 51 वर्षीय राहुल द्रविडची राष्ट्रीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा आहे किंवा नाही हे सध्या समजू शकलेले नाही.
प्रशिक्षकपदाच्या कालावधीत सातत्याने प्रवास आणि संघाची जबाबदारी द्रविडवर कायम असल्याने तो कदाचित दमला असावा असे वाटते भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्याने आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स या संघांना यापूर्वी मार्गदर्शन करत होता. त्यामुळे भविष्य काळात तो पुन्हा या संघापैकी एकाला मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या समस्येमुळे कदाचित ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी लक्ष्मणकडे हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, बुमराह यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी ताजेतवाने होण्याकरिता प्रमुख खेळाडुंना विश्रांती देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील टी-20 मालिकेला 23 नोव्हेंबरपासून विशाखपट्टणम येथे प्रारंभ होईल.









