प्रतिनिधी /बेळगाव
तरुणांच्या उत्तम भविष्यासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. याविरुद्ध सोमवारी पुकारण्यात आलेल्या बेळगाव बंदला कोणीही पाठिंबा देऊ नये, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.
बंद व निदर्शने काँग्रेसच्या चिथावणीमुळेच होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. ते सहन न झाल्यामुळेच काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अग्निपथ योजनेला विरोध केला आहे. नॅशनल हेरॉल्ड घोटाळय़ामुळे काँग्रेसची उरलीसुरली लाजही गेली आहे, अशी टीका त्यांनी पत्रकात केली आहे.
नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी बंद, निदर्शने व हिंसाचाराला काँग्रेस पाठिंबा देत आहे. बंदच्या माध्यमातून अराजकता माजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणांनी या प्रयत्नांना बळी पडू नये. अशा बंदच्यावेळी हिंसाचार झाला तर तुमच्या भविष्यावर परिणाम होतो. तुमच्या मदतीला कोणीच येत नाही. त्यामुळे बंद व आंदोलनाला कोणीही पाठिंबा देऊ नये, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.









