चर्चा करण्यास वेळ देण्याची सभाध्यक्षांकडे मागणी
बेळगाव : मंगळवारप्रमाणेच बुधवारी देखील विधानसभेत नारळ उत्पादकांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी निजद आमदारांनी विधानसभेत आग्रही भूमिका घेत धरणे आंदोलन छेडले असतानाच काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी ऊस उत्पादकांच्या समस्यांसह उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्यांवर चर्चेसाठी वेळ द्या, असा आग्रह विधानसभा अध्यक्षांकडे धरला. विधानसभेत नारळ उत्पादकांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी निजदचे आमदार एच. डी. रेवण्णा यांनी सभाध्यक्षांकडे केली. त्यावेळी लक्ष्मण सवदी यांनी मधेच हस्तक्षेप करत, तुमच्यावतीने मी बोलण्यास तयार असल्याचे रेवण्णांना सांगितले. त्यामुळे सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी कोणालाही कोणाच्या बाजूने बोलण्याची मुभा देणार नाही, असे ठणकावले. मुभा देणार नाही, या सभाध्यक्षांच्या भूमिकेमुळे सवदी काहीसे संतप्त झाले. तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवर बोलण्यासाठी वेळ देत नाही. चर्चेसाठी वेळ द्या. बेळगावमध्ये अधिवेशन होत आहे. उत्तर कर्नाटक भागातील ज्वलंत समस्यांवर सभागृहात चर्चा घडवून आणावी. बेंगळूरच्या समस्या, ‘ब्रँड बेंगळूर’विषयी चर्चा नको, अशी परखड भूमिका मांडली. दरम्यान, सभाध्यक्षांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दुष्काळाशी संबंधित चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर उत्तर कर्नाटक भागातील मुद्द्यांवरही चर्चा करण्याची मुभा आहे, असे सांगून पुढील कामकाज हाती घेत असल्याचे सांगितले.
निजदचे धरणे
विधानसभेत नारळ उत्पादकांच्या समस्या मांडण्याच्या अजेंड्यात आपले नाव नाही, आपल्यालाही या समस्येवर चर्चा करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करून आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केले. बुधवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच रेवण्णा यांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, सभाध्यक्षांना उद्देशून नारळ उत्पादकांच्या समस्येवर बोलण्यासाठी तुम्ही शून्य प्रहर वेळ निश्चित केली आहे. मात्र, अजेंड्यातून रेवण्णांचे नाव वगळण्यात आले आहे. केवळ काँग्रेसच्या शिवलिंगेगौडा यांचे नाव आहे, असे सांगितले. त्यानंतर सभाध्यक्षांनी तुम्हाला बोलण्याची मुभा दिली जाईल. आंदोलन मागे घ्या, असे सांगितले. त्यानंतर निजद आमदारांनी आंदोलन मागे घेतले.









