शशिकांत नाईक यांचाही समावेश : भाजपला रामराम : विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा
बेंगळूर, संकेश्वर : भाजपच्या रणनीतीला कंटाळून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि माजी जिल्हा पालकमंत्री शशिकांत नाईक यांनी शुक्रवारी बेंगळूर येथे भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीत सवदी व नाईक यांच्या काँग्रेस प्रवेशाने बेळगाव जिल्ह्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. याचा लाभ काँग्रेस उठविण्याच्या तयारीत असून लिंगायत मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अथणी मतदारसंघात भाजपचे तिकीट हुकल्याने माजी उपमुख्यमंत्री लक्षण सवदी यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सायंकाळी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांची भेट देऊन विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी थेट प्रदेश काँग्रेस कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी व माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व इतर नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष विमानाने बेंगळूरला शुक्रवारी सकाळीच लक्ष्मण सवदी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासमवेत सांबरा विमानतळावरून विशेष विमानाने बेंगळूरला रवाना झाले. त्यांनी प्रारंभी डी. के. शिवकुमार आणि रणदीप सुरजेवाला यांची भेट घेऊन चर्चा केली. नंतर एकाच कारमधून तिघेही सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी आले. काँग्रेस प्रवेशासंबंधी सवदींशी चर्चा झाली. यावेळी सवदींनी केलेल्या मागणीनुसार अथणी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे मान्य करण्यात आले. शिवार बेळगाव जिल्ह्यातील कागवाड, सौंदत्ती, अथणी, रामदुर्ग या मतदारसंघांमधील निवडणुकीची जबाबदारी देण्याची मागणीही सवदींनी केली असून या चार मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचे आश्वासन त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिले. बेळगावहून सवदी बेंगळूरला आलेले विमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नावे बूक करण्यात आले होते, हे विशेष.
भाजप नेत्यांनी शब्द पाळला नाही!
मागील पोटनिवडणुकीवेळी महेश कुमठहळ्ळींना विधानसभा रिंगणात उतरविताना पुढील निवडणुकीत आपल्याला तिकीट देण्याचे भाजपश्रेष्ठींनी मान्य केले होते. विधानपरिषद सदस्यपदाच्या कालावधीपर्यंत कुमठहळ्ळींना नेमण्यात येत आहे. पक्षाला सत्तेवर येण्यासाठी कारणीभूत असलेल्यांना तिकीट द्यावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिकीट नाही, असेही भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते. असे असेल तर आर. शंकर, एच. नागेश यांना तिकीट का दिले नाही?, असा प्रश्न उपस्थित करून सवदींनी दिलेला शब्द भाजप नेत्यांनी पाळलेला नाही. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडल्याचे सांगितले. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करून आपला अपमान करण्यात आला. आपण भ्रष्टाचार केला का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपण पक्ष सोडण्यास भाजप नेत्यांचे दुटप्पी धोरणच कारणीभूत आहे. येडियुराप्पांसह कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला नाही.
शशिकांत नाईक यांचा काँग्रेस प्रवेश
भाजप पक्ष वाढवण्यासाठी ग्रामीण भागापासून जिल्ह्यापर्यंत आघाडीचे प्रयत्न केले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली. या निवडणुकीत विजयी होऊन जिल्हा पालकमंत्रिपदी स्वच्छ व पारदर्शक कारभार केला. अवघ्या 11 महिन्यांच्या मंत्रपिदाच्या काळात व त्यानंतर आजतागायत भाजप वरिष्ठाने दिलेल्या सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. पण, भाजप वरिष्ठांनी गत 15 वर्षांच्या काळात विधानपरिषद सदस्यत्व देण्याचे मान्य केले होते. तेही दिले नाही, अशी नाराजी माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी व्यक्त केली. कत्ती बंधुंनी स्थानिक राजकारणात आमच्याविऊद्ध राजकारण केले. त्यांच्या वाढत्या दंडुकेशाहीला कंटाळलो. शिवाय उमेश कत्तींच्या निधनानंतर हुक्केरी विधानसभेची उमेदवारी वरिष्ठांकडे मागितली होती. पण आपल्याला उमेदवारी यादीतून डावलण्यात आले आहे. हे बाब मनाला चटका लावणारी आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न
आपण कोणतीही अट घातलेली नाही. केवळ एकच मागणी केली आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास अथणी मतदारसंघातील बाकी असणाऱ्या पाणीपुरवठा योजना पूर्ण कराव्यात. पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करेन. सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे.
– लक्ष्मण सवदी, माजी उपमुख्यमंत्री
सवदींनी भाजप सोडल्याचे दु:ख
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना भाजपमध्ये चांगले भविष्य आहे. पण त्यांनी भाजप सोडल्याचे आपल्याला दु:ख आहे. काँग्रेसला 60 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्याची ताकद नाही. त्यामुळे ते काही जणांना बाहेरून आणत आहेत.
– बसवराज बोम्माई, मुख्यमंत्री
सवदींना सर्व प्रकारचा मानसन्मान देणार
सवदी यांच्याशी सौहार्दपूर्ण चर्चा झाली आहे. त्यांनी काँग्रेस कुटुंबाचा सदस्य होण्यास संमती दर्शविली आहे. काँग्रेस पक्ष त्यांना सर्व प्रकारे मानसन्मान देईल. सवदींप्रमाणेच भाजपमधील आणखी काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
– डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सवदींना विविध मतदारसंघांची मिळणार जबाबदारी?
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदींच्या प्रवेशामुळे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला प्रभावी नेता मिळाला आहे. लिंगायत मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी विविध मतदारसंघांमधील प्रचाराची जबाबदारी सवदींना देण्यात येण्याची शक्यता आहे. सवदींनी आपण उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. त्यामुळे या पदाला साजेशी जबाबदारी मिळायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांपुढे मांडत अप्रत्यक्षपणे मंत्रिपदावर डोळा ठेवला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास त्यांना मंत्रिपद मिळाल्यास नवल नाही.
कुमठहळ्ळींना उमेदवारी दिल्याने धक्का…
लक्ष्मण सवदी व शशिकांत नाईक हे दोघेही नेते संघ परिवार व भाजपचे कट्टर नेते होते. सुऊवातीपासूनच कर्नाटकात भाजप सरकार बहुमतात आणण्यासाठी त्यांनी आघाडीचे प्रयत्न केले होते. लक्ष्मण सवदी यांच्या राजकीय घोडदौडीमुळे 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत असतानाही भाजपने मंत्रिमंडळात त्यांना सामावून घेत उपमुख्यमंत्रिपद बहाल केले. मात्र, 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अथणीमधून महेश कुमठहळ्ळी यांचे नाव जाहीर करण्यात आल्याने सवदींना मोठा धक्का बसला.









