भटक्या समाजासाठी आदिवासी हक्कांची मागणी साताऱ्यात तीव्र
सातारा : ‘ भटक्या विमुक्त जमातींना आदिवासी दर्जा मिळावा’ ही मागणी पुन्हा एकदा तीव्रतेने पुढे आली आहे. भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार उपरकार लक्ष्मण माने यांनी हैदराबादच्या नोंदींचा दाखला देत स्पष्टपणे सांगितलं आहे की, भटक्या विमुक्त समाज हा मूळ आदिवासी स्वरूपाचा असून, त्यांचा ओबीसीत समावेश हा ऐतिहासिक अन्याय आहे
सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण माने यांनी सांगितलं की, हैदराबादच्या गॅझेटिअर नोंदीनुसार भटक्या समाजाची ओळख आदिवासी म्हणून नोंदवलेली आहे. मात्र नंतरच्या काळात शासनाने चुकीने या समाजाला ओबीसी वर्गात टाकलं. त्यामुळे आज या समाजाला ना आदिवासींचा लाभ मिळतोय, ना ओबीसींमधील आरक्षणात त्यांचं प्रतिनिधित्व वाढतंय.
त्यामुळे आता भटक्या विमुक्तांना ओबीसीमधून वगळून थेट आदिवासी प्रवर्गात सामावून घ्यावं, अशी ठाम मागणी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी संघटनेनं सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं असून, राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही तर पुढील आंदोलनाचा इशाराही दिला आहे.








