मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी : निवेदन स्वीकारण्यास विलंब केल्याने रोष व्यक्त
बेळगाव : रायबाग येथे वकिलाचा झालेला खून, त्याचबरोबर अन्य एका वकिलावर हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने गुरुवारी कामबंद आंदोलन छेडले. यानंतर चन्नम्मा चौकातून मोर्चाने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देण्यात आली. वकिलाचा खून व हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे देण्यात आले. अॅड. संतोष अशोक पाटील, राहणार सौंदत्ती या वकिलाचा 29 एप्रिल रोजी खून झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती रायबाग बार असोसिएशनच्यावतीने बेळगाव बार असोसिएशनला कळविण्यात आली आहे. त्याचबरोबर अॅड. सी. बी. गिड्डण्णावर, राहणार गोकाक यांच्यावर 17 जून रोजी हल्ला करण्यात आला आहे.
त्यामुळे या दोन्ही घटनांचा बेळगाव बार असोसिएशनच्या वकिलांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. वकिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलीस अधीक्षकांना करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा. वकिलांवर हल्ला होणे ही घृणास्पद व निंदनीय बाब आहे. खून झालेल्या वकिलाच्या कुटुंबीयांसोबत सर्व वकील व बार असोसिएशन आहे. तसेच हल्ला झालेल्या वकिलांच्या मागेही वकीलवर्ग ठामपणे उभा आहे. एकंदरीत आरोपींवर योग्य कारवाई करण्याची सूचना करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर व बार असोसिएशनाच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ गुरुवारी कामबंद आंदोलन छेडून आयोजित मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार वकीलवर्ग न्यायालय आवारात मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.
डीसी कार्यालयासमोर घोषणाबाजी
चन्नम्मा चौकातून मोर्चाने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अनुपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. निवेदन घेण्यास विलंब केल्याने वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला.









