चिक्कमंगळूर येथील मारहाण प्रकरणाचे पडसाद बेळगावात
बेळगाव : हेल्मेट न घातल्याच्या कारणास्तव चिक्कमंगळूर येथे पोलिसांनी एका वकिलाला अमानुष मारहाण केली. याच्या निषेधार्थ बेळगाव येथे वकिलांनी कामबंद करून कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे तीव्र आंदोलन छेडले व रास्तारोको केला. वकिलांच्या या आंदोलनामुळे दीड तासाहून अधिकवेळ गोंधळ उडाला. सदर वकिलांना मारहाण केल्याने न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले होते. या प्रकारानंतर पुन्हा वकिलांच्याच विरोधात पोलिसांनी आंदोलन करून धमकी दिली होती. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले आणि सर्वत्र वकिलांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले. बेळगावमधील वकिलांनीही आंदोलन छेडले.
या आंदोलनानंतर तातडीने बैठक घेण्यात आली. जुन्या लायब्ररी हॉलमध्ये बैठक झाली. यामध्ये अनेक वकिलांनी पोलिसांच्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदविला. या मारहाण प्रकरणाची सुनावणी बेंगळूर येथील उच्च न्यायालयामध्ये मंगळवारी आहे. त्या सुनावणीनंतरच पुढील रुपरेषा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे वकिलांसाठी असलेल्या हितरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी आता पाठपुरावा करण्याचेही ठरविण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री व कायदा मंत्री यांना बार असोसिएशनकडे बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी त्यांना तुम्ही दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न विचारण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर येथे झालेल्या वकिलांच्या कार्यशाळेमध्ये निश्चितच हितरक्षण कायद्याची अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे आता या सर्वच मंत्र्यांना बार असोसिएशनकडे बोलावून याबाबत मागणी करण्याचे ठरविले.
रास्तारोकोवेळी उडाला गोंधळ
बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह वकिलांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला. बराच उशीर रास्तारोको केला.यामुळे अनेकजण अडकले. काहीजणांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केला असता वकिलांनी त्यांना अडविले होते. त्यामुळे दुचाकीस्वार-चारचाकी चालकांबरोबर वादावादीचे प्रसंग घडले. पोलिसांनाही काहीच करता आले नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतली. यामुळे बराच उशीर अनेक जण अडकून राहिले.
प्रांताधिकाऱ्यांनाही धरले धारेवर
चिकोडीच्या प्रांताधिकाऱ्यांनी वकिलांच्या आंदोलनावेळी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वकील संतप्त झाले. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला. वाहन तेथेच ठेवून त्यांना पायपीट करतच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुन्हा जावे लागले. महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे मला जायचे आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र वकील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपल्यावर झालेला अन्याय हा मोठा आहे. त्यामुळे अशा आंदोलनावेळी तरी सहकार्य करा म्हणून जोरदार आवाज वकिलांनी उठविला. ज्येष्ठ वकिलांबरोबरच ज्युनिअर वकिलांनीही या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला. महिला वकिलांची संख्याही लक्षणीय होती. बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील, जॉईंट सेक्रेटरी बंटी कपाई यांच्यासह सदस्य पी. के. पवार, अॅड. इरफान बयाळ, अॅड. आण्णासाहेब घोरपडे, अॅड. आर. पी. पाटील, अॅड. श्रीकांत कांबळे, अॅड. श्रीधर मुतगेकर, अॅड. सुनील काकतकर, अॅड. शिंदे, माजी अध्यक्ष अॅड. आर. सी. पाटील, अॅड. तिप्पान्ना सनदी, अॅड. नंदकुमार पाटील, अॅड. एन. आर. लातूर, अॅड. रतन मासेकर, अॅड. पूजा पाटील, अॅड. प्रियांका पाटील, अॅड. पूजा पालकर यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.









