कार पार्किंगवेळी पोलिसांनी वकिलाला दमदाटी केल्यामुळे तीव्र संताप
बेळगाव ; सीईएन पोलीस कार्यालयासमोर कार पार्किंग करताना पोलिसांनी वकिलाला दमदाटी केल्यामुळे पुन्हा वकिलांनी तीव्र आंदोलन केले. न्यायालयासमोरील मुख्य रस्त्यावर काहीवेळ रास्तारोको करून त्याचा निषेध नोंदविण्यात आला. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. काही कामानिमित्त मार्केट पोलीस स्थानकाच्या मागील बाजूला असलेले सीईएन पोलीस स्थानकाजवळ वकील कार पार्किंग करीत होते. यावेळी पोलिसांनी येथे कार पार्किंग करू नका, म्हणून त्यांच्याशी वादावादी केली. यामुळे संतप्त झालेल्या काही वकिलांनी मंगळवारी दुपारी रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला होता. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वकिलांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर ज्येष्ठ वकिलांनी चर्चा करून हे आंदोलन मागे घेतले. आंदोलनामध्ये वकिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.









