रास्तारोकोमुळे काहीकाळ वाहतूक ठप्प : आश्वासनानंतर आंदोलन मागे
खानापूर : खानापूर-बेळगाव शटल बससेवा 14 जुलैपर्यंत सुरू करण्यात यावी, अन्यथा रास्तारोको करू, असा इशारा खानापूर वकील संघटनेने दहा दिवसापूर्वी दिला होता. मात्र याची दखल परिवहन मंडळाचे खानापूर आगारप्रमुख महेश तिरकन्नावर व बेळगावच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणताही क्रम न घेता वकिलांच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती. वेळेत बससेवा सुरू न झाल्याने खानापूर वकील संघटनेच्यावतीने बेळगाव-खानापूर रस्त्यावर सकाळी 11 वाजता रास्तारोको करण्यात आला. खानापूर परिसरातून बेळगावला रोज हजारो विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरवर्ग तसेच इतर लोक कामासाठी बेळगावला जात असतात. मात्र खानापूरहून बेळगावला व बेळगावहून खानापूरला येण्यासाठी पुरेशी बससेवा नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होत होते. यासाठी वकील संघटनेने शटल बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. आणि 14 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र याबाबत कोणताच सकारात्मक निर्णय न घेतल्याने अथवा वकील संघटनेशी याबाबत आगारप्रमुखांनी कोणतीही चर्चा न केल्याने वकील संघटनेने शुक्रवारी सकाळी रास्तारोकोचा निर्णय घेतला. त्यानुसार कामकाज स्थगित करून न्यायालयासमोरच रास्तारोको केला. त्यामुळे बेळगाव-खानापूर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.
आगारप्रमुख महेश तिरकन्नावर यांनी आंदोलनस्थळी भेट देवून वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व निवेदनाचा स्वीकार केला. शटल बससेवा सुरू करण्यासंदर्भात आपण वरिष्ठांशी चर्चा केली असून यासंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानंतर वकील संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले. येत्या आठ दिवसात बससेवा सुरू न केल्यास उग्र आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही आगारप्रमुखांना दिला आहे. वकील संघटनेचे अध्यक्ष, आय. आर. घाडी, ज्येष्ठ वकील व्ही. एम. पाटील, एच. एन. देसाई, सादीक नंदगडी, गजानन देसाई, ज्येष्ठ वकील अरुण सरदेसाई, केशव कळळेकर, चेतन मणेरीकर, मारुती कदम, हेरेकर, जी. जी. पाटील, सिद्धार्थ कपिलेश्वरी, माजी आमदार अरविंद पाटील, बाबुराव देसाई, सुभाष चलवादी, दिलीप पवार यासह कार्यकर्ते व वकील सहभागी होते.









