हलगा क्रॉसजवळ मोर्चा अडविण्यात आल्याने वकिलांनी राष्ट्रीय महामार्गावरच छेडले ठिय्या आंदोलन : आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका

प्रतिनिधी /बेळगाव
वकिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कायदा करण्यात यावा, अशा मागणीसाठी राज्य वकील संघटनेने मंगळवारी सुवर्णसौधवर मोर्चा काढला. मात्र हलगा क्रॉसजवळ मोर्चा अडविण्यात आल्याने वकिलांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने सुवर्णसौधवर जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वकील आणि पोलिसांमध्ये झटापटीही झाली. मात्र या आंदोलनात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले.

वकील सुरक्षा कायदा करण्यात यावा, या मागणीकरिता यापूर्वी न्यायालयीन कामकाज बंद ठेवून आंदोलन छेडण्यात आले होते. या मागणीची पूर्तता करावी, याकरिता मंगळवारी राणी चन्नम्मा चौकातून सुवर्णसौधवर मोर्चा काढण्यात आला. सुवर्णसौध येथे धरणे आंदोलनासाठी जाणारा मोर्चा हलगा क्रॉसजवळ पोलिसांनी रोखून धरला. बॅरिकेड्स लावून वकिलांना पुढे जावू दिले नाही. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर कडे तयार केले. तरीदेखील काही वकिलांनी पोलिसांचे कडे तोडून सुवर्णसौधकडे कूच केली. यावेळी काही वकिलांनी शेतवडीतून धाव घेऊन सुवर्णसौध गाठले. मात्र त्या ठिकाणीदेखील तैनात केलेल्या पोलिसांनी वकिलांना रोखून धरले. या दरम्यान बॅरिकेड्सला धक्का देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न वकिलांनी केला. पण पोलीस तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी वकिलांना पुढे जावू दिले नाही. यावेळी लावण्यात आलेले बॅरिकेड्स ओढून काढण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. यादरम्यान पोलीस व आंदोलक वकिलांमध्ये झटापटी झाली. दुपारी अडीच वाजता राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन सुरू झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एका बाजूने वळविण्यात आली. पण रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि आंदोलकांमधील झटापट तब्बल 1 तास सुरू होती. पोलिसांची वाहने आणि कुमक चारही बाजूने तैनात केली. पण अडकलेल्या वाहनांना जाण्यासाठी मार्ग करण्यात आला नाही. परिणामी हलगा क्रॉसपासून बेळगावपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सुवर्णसौधच्या प्रवेशद्वारावरही पोलीस आणि आंदोलक वकिलांमध्ये चांगलीच जुंपली होती. आंदोलकांनी विविध मार्गांचा अवलंब करून सुवर्णसौधकडे धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनंती केली. मात्र या विनंतीला न जुमानता आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. शेकडो वाहने या वाहतूक कोंडीत राष्ट्रीय महामार्गावर अडकून पडली. रुग्णवाहिकांना ये-जा करण्यासाठीही रस्ता नव्हता. सर्व्हिस रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जेवणासाठी बाहेर पडलेले काही अधिकारी, मंत्री या वाहतूक कोंडीत अडकले. वकिलांचे आंदोलन पांगविण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. पण वकिलांच्या आंदोलनापुढे काहीच करता आले नाही. पोलिसांनी सुवर्णसौधवर जाऊ दिले नसल्याने आंदोलकांनी पोलिसांविरोधात धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली.
सुवर्णसौधवर विविध मागण्यांसाठी अनेक संघटनांनी आंदोलन छेडले होते. निवेदन दिल्यानंतर तसेच आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आंदोलकही या वाहतूक कोंडीत अडकून पडले. राष्ट्रीय महामार्ग असल्याने कुटुंबासह जाणारे वाहनधारक तसेच मालवाहतूक करणारी वाहने, ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, परिवहन मंडळाच्या बसेस अशी सर्वच वाहने रस्त्यावर दीड तासासाठी थांबून होती. नागरिकांचे हाल झाल्याने काही नेतेमंडळींनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांच्या आंदोलनास विरोध नाही पण वाहनधारक आणि नागरिकांना वेठीस धरण्यामागचा उद्देश काय? इतके पोलीस असूनदेखील वाहनांना ये-जा करण्यासाठी रस्ता खुला करून देता येत नाही का? अशी विचारणा केली. रस्ता खुला करावा, अन्यथा सर्व आंदोलक मिळून आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना नागरिकांनी दिला. या आंदोलनामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीही अडकून पडले होते. दुपारच्या जेवणाची वेळ असल्यामुळे जेवणासाठी बाहेर पडलेला नोकरवर्गदेखील अडकून राहिला होता. वाहनधारकांना वाहतूक कोंडीत अडकल्याने उपाशीपोटी रहावे लागले. उन्हाचा तडाका आणि वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी वाहतूक कोंडी नियंत्रण करताना पोलीस प्रशासनाची दमछाक झाली. अखेर आंदोलकांची भेट घेण्यासाठी महसूलमंत्री आर. अशोक आणि एच. डी. रेवण्णा या ठिकाणी दाखल झाले. आंदोलकांची मागणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे 10 ते 15 मिनिटे कोणतीच चर्चा करता आली नाही. त्यानंतर आंदोलकांबरोबर चर्चा करून मागणीची माहिती शासनापर्यंत पोहोचवून कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. ठिय्या आंदोलनास अडीच वाजता प्रारंभ झाला होता. तब्बल चार वाजता राष्ट्रीय महामार्ग खुला झाला.
यावेळी वैयक्तिक वाहनातून काही रुग्णांना रुग्णालयात नेण्यात येत होते. शेवटी काही वाहनधारक आणि पोलिसांनी मार्ग काढून दिल्याने रुग्णाचे वाहन बेळगावच्या दिशेने निघाले. पण ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा असल्याने अडचणीतून मार्ग काढताना नाहक त्रास सहन करावा लागला.
मंत्रीमहोदयांना आंदोलनाचा फटका
काही मंत्रीमहोदय शहरात आले होते. त्यांनादेखील आंदोलनाचा फटका बसला. या वाहतूक कोंडीत माजी मंत्री, आमदार रमेश जारकीहोळी यांचे वाहनही अडकले होते. यातून मार्ग निघत नसल्याने त्यांनी पायी चालतच सुवर्णसौधकडे जाण्याचा प्रयत्न केला. वकिलांच्या आंदोलनाजवळ आल्यानंतर पोलिसांच्या वाहनातून सुवर्णसौधवर सोडण्यात आले.
वकिलांचे आंदोलन नियंत्रित करण्यास पोलीस प्रशासन अपयशी
वकिलांच्या मोर्चास राणी चन्नम्मा चौकातून प्रारंभ झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरून सुवर्णसौधकडे पायी चालत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची माहिती पोलीस प्रशासनाला होती. सुवर्णसौधपर्यंत येण्यापूर्वी गांधीनगर किंवा राष्ट्रीय महामार्गावरच मोर्चा रोखता येणे शक्य होते. पण पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. सुवर्णसौधपासून अर्धा कि. मी. अंतरावर बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी किमान हा मोर्चा सर्व्हिस रस्त्यावर वळविला असता तर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नसती. पण इतका पोलीस फौजफाटा, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सुवर्णसौध परिसरात ठाण मांडूनही राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली. त्यामुळे हे आंदोलन नियंत्रित करण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला.









