सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात मुदस्सर लियाकत डिंगणकर (रत्नागिरी) या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आह़े अर्जाच्या सुनावणीसाठी न्यायालयाने 17 ऑक्टोबर 2022 ही तारीख दिली असून या तारखेपर्यंत डिंगणकर यांना अटक न करण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आह़े.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश महम्मद कासिम शेख मुसा शेख यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आह़े स्वप्नाली सावंत खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे करत आहेत़ सत्र न्यायालयाकडून या प्रकरणी तपासी अधिकारी वाघमारे यांना डिंगणकर यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले जाणार आह़े 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुणावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आह़े.
1 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या स्वयंपाकगृहात गळा आवळून खून केल्याचे समोर आल़े या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (47), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (ऱा सर्व सडामिऱ्या रत्नागिरी) यांना अटक केल़ी तीनही संशयित सध्या पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून कसून तपास करण्यात सुरू आह़े.
स्वप्नाली सावंत यांचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट भाई सावंत व त्याच्या दोन्ही साथीदारांनी अत्यंत सफाईदारपणे केल़ी यामुळे तपास करणारे पोलीसही पुरते चक्रावून गेल़े भाई सावंत याने पोलिसांपुढे कबूल केल्याप्रमाणे स्वप्नाली यांचा मृतदेह घरामागे पेट्रोल टाकून जाळण्यात आल़ा यानंतर मृतदेहाची राख व हाडे समुद्रात टाकण्यात आल़ी घराचा परिसरही स्वच्छ करण्यात आल़ा खूनाचा कोणताही सुगावा पोलिसांना लागू नये, यासाठी अत्यंत थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्यात आल़े.
खून प्रकरणात भाई सावंत याचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले होत़े भाई सावंत याने रत्नागिरीमधील वकील मुदस्सर डिंगणकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे स्पष्ट झाले होत़े त्यामुळे भाई सावंत व वकिलांमध्ये नेमके काय बोलणे झाले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े स्वप्नाली सावंतच्या खूनाशी डिंगणकर यांचा संबंध आहे का, भाई सावंतने डिंगणकर यांना कशासाठी फोन केला, आदी प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आह़े.
स्वप्नाली सावंतने भाई सावंतविरूद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यापकरणी शहर पोलीस ठाण्यात तकार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांनी भाई सावंत याच्याविरूद्ध भादंवि कलम 307 नुसार गुन्हा दाखल केल़ा भाई सावंत याच्याविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपत्र ठेवले होत़े या खटल्यात भाई सावंत यांच्यावतीने मुदस्सर डिंगणकर यांनी वकीलपत्र घेतले होत़े त्यामुळे त्यांचा सातत्याने संपर्क होत होत़ा मात्र डिंगणकर यांचा स्वप्नाली सावंतच्या खूनाशी काही संबंध आहे का, या बाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े
ॲड. डिंगणकर चौकशीला गैरहजर
स्वप्नाली सावंत खून प्रकरणात भाई सावंत याच्याशी मुदस्सर डिंगणकर यांचे कॉल झाल्याचे समोर आले होत़े यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून डिंगणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आले होत़े मात्र अद्याप डिंगणकर चौकशीला समोर गेले नसल्याचे समोर आले आह़े









